South Africa vs India, 2nd T20I: आफ्रिकेने जिंकला दुसरा टी-20 सामना, भारताचा 5 विकेटने पराभव

WhatsApp Group

South Africa vs India: मंगळवारी रात्री झालेल्या T-20 मालिकेतील दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट संघाने भारतीय क्रिकेट संघाचा 5 विकेट राखून पराभव केला. या विजयासह यजमान दक्षिण आफ्रिकेने 5 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. यापूर्वी मालिकेतील पहिला सामना पावसामुळे वाहून गेला होता.

नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना भारताने 19.3 षटकांत 180 धावा केल्या. त्यानंतर पाऊस पडला आणि सामना थांबवावा लागला. यानंतर दक्षिण आफ्रिकेला 15 षटकांत 152 धावांचे सुधारित लक्ष्य देण्यात आले. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या आफ्रिका संघाने 13.5 षटकांत 5 गडी गमावून विजय मिळवला. संघातर्फे रीझा हेंड्रिक्सने सर्वाधिक 49 धावा केल्या. भारताकडून मुकेश कुमारने 2 बळी घेतले.

लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेकडून मॅथ्यू ब्रिटजे (16) आणि रीझा हेंड्रिक्स यांनी पहिल्या विकेटसाठी 42 धावांची भागीदारी केली. विकेट पडल्यानंतरही संघाने धावांचा वेग कमी होऊ दिला नाही. हेंड्रिक्स आणि एडन मार्कराम (30) यांनी दुसऱ्या विकेटसाठी 54 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. मार्कराम आणि हेन्रिक क्लासेन (7) यांना ठराविक अंतराने बाद करून भारतीय गोलंदाजांनी दबाव निर्माण केला. मात्र, भारत विजयापासून दूर राहिला.

हेही वाचा – IPL 2024 Auction Live: कधी, कुठे आणि कोणत्या वेळी पाहू शकाल LIVE आयपीएल लिलाव?

रिंकूचे पहिले अर्धशतक

रिंकू सिंगने तुफानी फलंदाजी केली त्याने मैदानाच्या प्रत्येक कोपऱ्यात फटके मारले. त्याने त्याच्या टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीतील पहिले अर्धशतक झळकावले. त्याच्या डावात त्याने 174.36 च्या स्ट्राइक रेटने 39 चेंडूत 68* धावा केल्या. या खेळीत त्याने 9 चौकार आणि 2 षटकारही मारले.

सूर्यकुमारने टी-20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील 17 वे अर्धशतक झळकावले.

आघाडीची फळी ढासळल्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या सूर्यकुमारने संघासाठी अतिशय उपयुक्त खेळी खेळली. 155.56 च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करताना त्याने 36 चेंडूत 56 धावा केल्या. यादरम्यान त्याच्या बॅटमधून 5 चौकार आणि 3 षटकार आले. सूर्यकुमारचे हे टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीतील 17 वे अर्धशतक होते. दक्षिण आफ्रिकेविरुद्धचे या फॉरमॅटमधील हे त्याचे 5वे अर्धशतक होते.

हेही वाचा – आयसीसी वर्ल्ड कप 2024चे वेळापत्रक जाहीर, भारत ‘या’ संघाविरुद्ध खेळणार पहिला सामना

सूर्यकुमारने आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये 2 हजार धावा केल्या पूर्ण 

सूर्यकुमार यादव टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 2,000 धावा करणारा सर्वात जलद भारतीय फलंदाज बनला. त्याने 56 व्या डावात ही कामगिरी केली. यासह त्याने विराट कोहलीची (56 डाव) बरोबरी केली आहे. या यादीत दुसऱ्या क्रमांकावर यष्टीरक्षक फलंदाज केएल राहुल आहे ज्याने 2000 टी-20 आंतरराष्ट्रीय धावांसाठी 58 डाव खेळले आहेत.