प्रत्येक महिलेच्या खात्यात 3 हजार रुपये प्रत्येक महिन्याला इंडिया आघाडीचं सरकार पाठवेल. महिलांच्या बँक खात्यात तीन हजार रुपये थेट खटाखट खटाखट खटाखट खटाखट खटाखट पाठवणार आहोत. महाराष्ट्रातील महिला बसमधून प्रवास करतील तेव्हा त्यांना बस तिकीट खरेदी करण्यासाठी एक रुपया द्यावा लागणार नाही.
भाजपच्या सरकारनं महागाईचा त्रास, गॅस सिलिंडरच्या दराचा त्रास, बेरोजगारीचा त्रास सर्वाधिक महिलांना होतो. त्यामुळं महाराष्ट्राच्या महिलांच्या खात्यात थेट तीन हजार रुपये पाठवणार आणि राज्यात सर्वत्र मोफत प्रवास या गॅरंटी देणार असल्याचं राहुल गांधी म्हणाले.
शेतकऱ्यांचे तीन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्यात येणार असल्याची घोषणा काँग्रेसने केली आहे. जे शेतकरी नियमित कर्जफेड करतात त्यांना 50,000 रुपयांचे प्रोत्साहन दिले जाईल. 50 टक्के आरक्षणाची मर्यादा हटवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. 25 लाखांपर्यंतचा आरोग्य विमा आणि लोकांना मोफत औषधेही दिली जाणार आहेत. बेरोजगार तरुणांना दरमहा 4 हजार रुपयांपर्यंत भत्ता दिला जाईल, असं राहुल गांधी म्हणाले.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी म्हणाले की, भाजपच्या धोरणांमुळे रोजगार नष्ट झाला आहे. अदानी धारावीची जमीन हिसकावून घेऊ शकतात, पण रोजगार देऊ शकत नाहीत. लघुउद्योग रोजगार देऊ शकतो, भाजपने ते सर्व उद्ध्वस्त केले आहे. जीएसटी, नोटाबंदी हे धोरण नव्हते. लघुउद्योग नष्ट करण्याचे हे हत्यार होते. भाजपवर निशाणा साधत राहुल गांधी म्हणाले की, भारतात गरीब लोक सर्वाधिक कर भरतात. हा पैसा अप्रत्यक्ष कर म्हणून दिला जातो. हे सर्व भाजपचे धोरण आहे. एक प्रकारे हे अब्जाधीशांचे सरकार आहे, असं राहुल गांधी म्हणाले.