IND vs SA 3rd ODI: भारताचा दक्षिण आफ्रिकेवर दणदणीत विजय, वनडे मालिका 2-1 ने जिंकली

IND vs SA: भारतीय संघाने तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 78 धावांनी पराभव केला.

WhatsApp Group

India vs South Africa 3rd ODI: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळली गेलेली 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका भारताने 2-1 ने जिंकली आहे. तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाने 78 धावांनी विजय मिळवला. 297 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेला केवळ 218 धावा करता आल्या. या मालिकेतील पहिला सामना भारताने तर दुसरा एकदिवसीय सामना दक्षिण आफ्रिकेने जिंकला होता.

दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडन मार्करामने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारताकडून संजू सॅमसन (118) आणि तिलक वर्मा (52) यांच्या शानदार खेळीच्या जोरावर भारताने 50 षटकांत 296 धावा केल्या होत्या. बुरॉन हेंड्रिक्सने सर्वाधिक 3 बळी घेतले. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेकडून फक्त टोनी डी जोर्जी (81) याने चांगली खेळी केली. त्याच्याशिवाय अन्य कोणत्याही फलंदाजाला मोठी खेळी खेळता आली नाही. या सामन्यात अर्शदीप सिंगने 4 बळी घेतले.

हेही वाचा – Sanju Samson: वनडे क्रिकेटमध्ये संजू सॅमसनने रचला इतिहास, पहिल्यांदाच घडलं असं काही

संजू सॅमसनने पहिले शतक झळकावले

सॅमसनने या सामन्यात 110 चेंडूंचा सामना करत आपले शतक पूर्ण केले. त्याच्या बॅटमधून 6 चौकार आणि 3 षटकार आले. त्याचा स्ट्राईक रेट 94.74 होता. हे त्याचे वनडे कारकिर्दीतील पहिले शतक होते. एकदिवसीय क्रिकेटमधील त्याची सरासरी आता 56.67 वर पोहोचली आहे. या डावात त्याने वनडेत 500 धावाही पूर्ण केल्या. तिलक वर्मा आणि सॅमसन यांच्यात 136 चेंडूत 116 धावांची भागीदारी झाली होती.

तिसरा एकदिवसीय सामना बोलंड पार्क येथे खेळला गेला. येथे वनडे सामन्यात शतक झळकावणारा सॅमसन हा तिसरा भारतीय ठरला. त्याच्या आधी सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुली यांनी येथे शतके झळकावली होती. या दोघांनी केनियाविरुद्ध शतके झळकावली होती. दक्षिण आफ्रिकेच्या भूमीवर वनडेमध्ये शतक झळकावणारा सॅमसन हा 8वा भारतीय फलंदाज आहे.
त्याच्या व्यतिरिक्त विराट कोहली (1), शिखर धवन (1), रोहित शर्मा (1), सचिन (1), सौरव (1), युसूफ पठाण (1) आणि वुरकेरी रमन (1) यांनी शतके झळकावली आहेत.

हेही वाचा – Sakshi Malik: रिओ ऑलिम्पिक पदक विजेती साक्षी मलिकने कुस्तीतून घेतली निवृत्ती

अर्शदीप सिंहची जबरदस्त गोलंदाजी 

या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी चमकदार कामगिरी केली. अर्शदीपने 9 षटकांत 1 मेडन ओव्हरसह 30 धावा दिल्या आणि 4 बळी घेतले. मुकेश कुमार आणि अक्षर पटेल यांना प्रत्येकी 1 यश मिळाले. आवेश खान आणि वॉशिंग्टन सुंदरने सामन्यात 2-2 विकेट घेतल्या. अर्शदीपने पहिल्या सामन्यातही शानदार गोलंदाजी करत 5 विकेट्स घेतल्या होत्या. या सामन्यात एकही भारतीय गोलंदाज महागात पडला नाही.

दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात शानदार शतक झळकावणाऱ्या दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर जोर्जीने दुसऱ्या सामन्यातही शानदार फलंदाजी करत 87 चेंडूत 81 धावा केल्या. त्याच्या बॅटमधून 6 चौकार आणि 3 षटकार आले. मात्र, तो आपल्या संघाला विजयापर्यंत नेऊ शकला नाही. जोर्जीने भारताविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात 119 धावांची खेळी केली होती आणि संघाला विजय मिळवून दिला होता. त्याने आपला उत्कृष्ट फॉर्म कायम ठेवला आहे.