T20 World Cup 2026: झिम्बाब्वे संघाची घोषणा! ‘या’ स्टार ऑलराउंडरकडे सोपवली कमान; दिग्गज खेळाडूचे संघात पुनरागमन
आगामी आयसीसी पुरुष टी२० वर्ल्ड कप २०२६ साठी झिम्बाब्वे क्रिकेटने आपल्या १५ सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. या महत्त्वाच्या स्पर्धेसाठी अनुभवी अष्टपैलू खेळाडू सिकंदर रझा याच्याकडे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. २०२४ च्या टी२० वर्ल्ड कपसाठी पात्र ठरू न शकलेल्या झिम्बाब्वेने यंदा आफ्रिका रीजन क्वालिफायरमध्ये जबरदस्त कामगिरी करत आपले स्थान निश्चित केले आहे.
ब्रेंडन टेलर आणि ग्रीम क्रीमरची ‘सरप्राइज’ एन्ट्री
या संघ निवडीतील सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे अनुभवी यष्टीरक्षक-फलंदाज ब्रेंडन टेलर आणि फिरकीपटू ग्रीम क्रीमर यांचे पुनरागमन. टेलरने साडेतीन वर्षांच्या बंदीनंतर क्रिकेटमध्ये पुनरागमन केले असून त्याच्या अनुभवाचा फायदा संघाला मधल्या फळीत होईल. तसेच, ३९ वर्षीय लेग-स्पिनर ग्रीम क्रीमरने ७ वर्षांच्या प्रदीर्घ विश्रांतीनंतर संघात स्थान मिळवले आहे, ज्यामुळे फिरकी विभाग अधिक मजबूत झाला आहे.
Zimbabwe have unveiled their squad for the Men’s #T20WorldCup 2026 📋
Details ⬇️https://t.co/fg4j49AkTm
— ICC (@ICC) January 2, 2026
वेगवान गोलंदाजी आणि फलंदाजीचे समीकरण
संघाच्या वेगवान गोलंदाजीची धुरा ब्लेसिंग मुजरबानी आणि रिचर्ड नगारवा यांच्या खांद्यावर असेल. मुजरबानी दुखापतीतून सावरल्यानंतर संघात परतला आहे. फलंदाजीमध्ये युवा ब्रायन बेनेट याच्यावर धावा करण्याची मोठी जबाबदारी असेल, ज्याने क्वालिफायर सामन्यांमध्ये चमकदार कामगिरी केली होती. याशिवाय रयान बर्ल आणि तदिवानाशे मारुमानी यांसारखे स्फोटक खेळाडूही संघात आहेत.
ग्रुप-बी मध्ये झिम्बाब्वेचा समावेश
टी२० वर्ल्ड कप २०२६ मध्ये झिम्बाब्वेचा समावेश ग्रुप-बी मध्ये करण्यात आला आहे. या ग्रुपमध्ये त्यांच्यासोबत ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, आयर्लंड आणि ओमान हे संघ आहेत. झिम्बाब्वे आपला पहिला सामना ९ फेब्रुवारी २०२६ रोजी कोलंबोमध्ये ओमानविरुद्ध खेळणार आहे.
टी२० वर्ल्ड कप २०२६ साठी झिम्बाब्वेचा संघ:
सिकंदर रझा (कर्णधार), ब्रायन बेनेट, रयान बर्ल, ग्रीम क्रीमर, ब्रॅडली इव्हान्स, क्लाइव्ह मदांडे, तिनोतेंदा मापोसा, तदिवानाशे मारुमानी, वेलिंग्टन मसाकाद्झा, टोनी मुनयोंगा, ताशिंगा मुसेकिवा, ब्लेसिंग मुजरबानी, डायन मायर्स, रिचर्ड नगारवा, ब्रेंडन टेलर.
