भारतीय क्रिकेट संघाचा फिरकीपटू युजवेंद्र चहल पुन्हा एकदा मैदाबाहेरच्या गोष्टींमुळे चर्चेत आला आहे. ‘उल्लू’ आणि ‘गंदी बात’ सारख्या प्रसिद्ध वेब सीरिजमधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री तानिया चॅटर्जी हिने चहलवर खळबळजनक दावा केला आहे. चहलने आपल्याला इंस्टाग्रामवर मेसेज करून ‘क्यूट’ म्हटल्याचे तानियाने एका व्हिडिओमध्ये उघड केले असून, याचे काही स्क्रीनशॉट्स आणि चॅट्स देखील दाखवले आहेत. या दाव्यामुळे क्रिकेट वर्तुळात आणि सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली आहे.
मेसेज दाखवून केला दावा; अभिनेत्रीने उघड केले ‘चॅट्स’
एका कार्यक्रमादरम्यान पॅपराझींशी बोलताना तानिया चॅटर्जीने तिचा मोबाईल काढून थेट युजवेंद्र चहलचे इंस्टाग्राम चॅट्स दाखवले. “हे बघा, चहलने मला मेसेज केले आहेत, त्याने मला क्यूट म्हटले आहे,” असे सांगत तिने तिचा इनबॉक्स कॅमेऱ्यासमोर धरला. तानिया याआधी ‘तितलियां’ आणि ‘गंदी बात’ यांसारख्या बोल्ड आशय असलेल्या वेब सीरिजमध्ये दिसली आहे. या खुलाशामुळे चहलच्या खासगी आयुष्याबद्दल पुन्हा एकदा उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.
View this post on Instagram
नेटकऱ्यांचा संताप; “म्हणूनच संघात पुनरागमन होत नाहीये”
हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच युजवेंद्र चहलला चाहत्यांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. अनेक युजर्सनी चहलच्या मैदानातील कामगिरीपेक्षा त्याच्या सोशल मीडियावरील सक्रियतेवर बोट ठेवले आहे. एका युजरने कमेंट केली की, “हा माणूस मैदानावर खेळण्यापेक्षा दुसऱ्यांच्या मेसेजमध्ये जास्त वेळ घालवतो, मग त्याची संघात वापसी कशी होणार?” तर दुसऱ्या एका युजरने “चहलचे दिवस आता संपले आहेत, त्याच्याकडून आता पुनरागमनाची अपेक्षा नाही,” अशा शब्दांत आपली नाराजी व्यक्त केली आहे.
खासगी आयुष्यातील वाद आणि सोशल मीडियावरील अटकळी
युजवेंद्र चहलचे वैयक्तिक आयुष्य गेल्या काही काळापासून सतत चर्चेत राहिले आहे. २०२५ मध्ये प्रसिद्ध कोरिओग्राफर धनश्री वर्मा हिच्याशी घटस्फोट झाल्यानंतर त्याच्याबद्दल अनेक अफवा सोशल मीडियावर पसरत आहेत. या पार्श्वभूमीवर तानिया चॅटर्जीने केलेल्या या नव्या दाव्याने आगीत तेल ओतण्याचे काम केले आहे. दरम्यान, या सर्व प्रकरणावर युजवेंद्र चहलच्या बाजूने अद्याप कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण किंवा प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.
