
सावंतवाडी – येथील संस्थानचे युवराज लखमराजे भोसले (Lakhmaraje Bhosle) यांनी मुंबईमध्ये माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) व भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या उपस्थितीमध्ये भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
भोसले यांच्या भाजपा (BJP) पक्षप्रवेशामुळे सावंतवाडी विधानसभा मतदार संघाची (Sawantwadi Assembly Constituency) गणिते आता बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सावंतवाडी राजघराणाच्या राजकीय वारसा लक्षात घेता राणी पार्वतीदेवी भोसले, शिवरामराजे भोसले यांनी आमदार म्हणून याठिकाणी काम केलं आहे. त्यानंतर आता युवराज लखमराजे भोसले यांनी राजकारणामध्ये पाऊल टाकल्यामुळे याठिकाणी भविष्यात वेगळं राजकीय चित्र पाहायला मिळणार आहे.
सावंतवाडी विधानसभा मतदार संघाचा विचार करता दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांची येथे चांगली पकड आहे. मात्र, राजघराण्याचे संबंध याठिकाणी चांगले असून युवराज लखमराजे यांच्या प्रवेशाचा भाजपला फायदा होऊ शकतो.
त्यांच्या भाजप प्रवेशामुळे सावंतवाडी भाजपाच्या गोटात आनंदाचे वातावरण आहे. मुंबईमध्ये झालेल्या या प्रवेशावेळी विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार नितेश राणे, माजी आमदार प्रसाद लाड यांच्यासह भाजपाचे वरिष्ठ नेते व पदाधिकारी उपस्थित होते.