Video: फक्त 47 चेंडूत 104 धावा… यशस्वी जयस्वालने षटकारांचा केला वर्षाव

WhatsApp Group

भारतीय क्रिकेट संघाचा युवा सलामीवीर यशस्वी जयस्वाल सध्या टी-२० विश्वचषक २०२६ च्या संघात स्थान न मिळाल्यामुळे चर्चेत आहे. मात्र, संघातून बाहेर असतानाही जयस्वालची बॅट शांत बसलेली नाही. त्याने पुन्हा एकदा आपली ताकद दाखवून दिली असून एका विशेष चॅलेंजमध्ये अवघ्या ४७ चेंडूत झंझावाती शतक झळकावले आहे. जरी हा आंतरराष्ट्रीय सामना नसला, तरी जयस्वालने ज्या पद्धतीने चेंडू सीमापार धाडले, ते पाहून निवडकर्त्यांनाही विचार करायला भाग पाडले आहे.

केविन पीटरसनचे ‘ते’ कठीण आव्हान

यशस्वी जयस्वालने हा पराक्रम इंग्लंडचा माजी दिग्गज फलंदाज केविन पीटरसनच्या ‘द स्विच’ (The Switch) या युट्यूब शोमध्ये केला आहे. पीटरसनने जयस्वालसमोर एक कठीण आव्हान ठेवले होते- ५० चेंडूंमध्ये १०० धावा पूर्ण करणे. हे आव्हान साधे नव्हते, कारण यात दोन अटी होत्या. पहिली अट म्हणजे, प्रत्येक चेंडूगणिक गोलंदाजीची गती १ मैल प्रति तासाने वाढणार होती. दुसरी अट म्हणजे, जितक्या वेळा तो बाद होईल, तितक्या वेळा त्याच्या एकूण धावसंख्येतून ५ धावा वजा केल्या जाणार होत्या.

बॉलींग मशीन विरुद्ध ‘यशस्वी’ संघर्ष

इंग्लंडमधील एका स्थानिक मैदानावर हे चॅलेंज पार पडले. ५१ मैल प्रति तास या गतीने सुरुवात झाली आणि हळूहळू वेग वाढत गेला. जयस्वालने सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेतला. या आव्हानादरम्यान तो दोन वेळा बाद झाला, ज्यामुळे त्याच्या धावसंख्येतून १० धावा कापण्यात आल्या. चेंडूचा वेग वाढल्याने काही चेंडू हुकले, तरीही त्याने हार मानली नाही. अखेर ४७ व्या चेंडूवर उत्तुंग षटकार खेचत जयस्वालने शतकी टप्पा गाठला आणि पीटरसनला थक्क केले.

आगामी आयपीएलवर जयस्वालची नजर

टी-२० विश्वचषकातील संघात स्थान न मिळाल्याने जयस्वालचे चाहते नाराज असले, तरी त्याच्या या कामगिरीने सर्वांना दिलासा दिला आहे. या विशेष आव्हानातून जयस्वालने आपली एकाग्रता आणि वेगवान गोलंदाजी खेळण्याची क्षमता पुन्हा एकदा सिद्ध केली आहे. आता जयस्वालची नजर आगामी आयपीएल हंगामावर असून, राजस्थान रॉयल्सचा हा हुकमी एक्का मैदानात आपली आक्रमक खेळी सुरू ठेवण्यासाठी सज्ज झाला आहे.