एकदिवसीय विश्वचषक 2023 श्रीलंकेच्या क्रिकेट संघासाठी आतापर्यंत काही खास राहिलेला नाही. आतापर्यंत खेळलेल्या चारपैकी तीन सामन्यांमध्ये संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे, तर नेदरलँडविरुद्धच्या सामन्यात एक विजय मिळाला आहे. दरम्यान, संघाचा सामना विजेता वेगवान गोलंदाज मथिशा पाथिराना देखील दुखापतीमुळे संपूर्ण स्पर्धेतून बाहेर आहे. पाथीरानाच्या जागी माजी कर्णधार आणि अनुभवी अष्टपैलू अँजेलो मॅथ्यूजचा श्रीलंकेच्या संघात समावेश करण्यात आला आहे.
श्रीलंकेचा अनुभवी खेळाडू लसिथ मलिंगाच्या अॅक्शनप्रमाणे गोलंदाजी करणाऱ्या मथिशा पाथिरानाकडून विश्वचषकात संघाला चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती. पथिरानाला भारतीय खेळपट्ट्यांवर गोलंदाजीचा अनुभवही आहे कारण तो आयपीएलमध्ये खेळला असला तरी तो अपेक्षेप्रमाणे कामगिरी करू शकला नाही. पाथिरानाला विश्वचषकात फक्त दोन सामने खेळण्याची संधी मिळाली आणि यादरम्यान तो 9 पेक्षा जास्त सरासरीने धावा देत केवळ 2 विकेट घेऊ शकला. पाथिरानाआधी श्रीलंकेचा संघाचा कर्णधार दासुन शनाकाही अनफिट असल्यामुळे बाहेर पडला होता.
हेही वाचा – सर्वांची लाडकी अभिनेत्री सोनम कपूरने मुंबईत घेतलं घर
मथिशा पाथिरानाच्या जागी श्रीलंकेच्या संघाने अनुभवी अष्टपैलू अँजेलो मॅथ्यूजला संघाचा भाग बनवले आहे. मॅथ्यूजने २०१५ मध्ये झालेल्या एकदिवसीय विश्वचषकात संघाचे नेतृत्व केले होते. 2019 च्या विश्वचषकातही तो संघाचा एक भाग होता. मॅथ्यूजच्या समावेशामुळे श्रीलंकेच्या संघाला फलंदाजीत बळ मिळेल, तर गोलंदाजीतही तो उपयुक्त ठरू शकतो. मॅथ्यूजने आतापर्यंत 5865 धावा केल्या असून 120 विकेट्सही घेतल्या आहेत. श्रीलंकेला 2023 च्या विश्वचषक स्पर्धेतील आपला पुढील सामना 26 ऑक्टोबर रोजी बेंगळुरू येथील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर इंग्लंडविरुद्ध खेळायचा आहे.