पैठण येथे महिला मतदार मेळावा

0
WhatsApp Group

छत्रपती संभाजीनगर: आपल्या जिल्ह्यातच नव्हे तर देशातही ५० टक्के मतदार महिला आहेत. मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी तसेच लोकांचा मतदान प्रक्रियेत सहभाग वाढविण्यासाठी महिलांनी स्वतः मतदान व मतदार जागृतीसाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांनी आज पैठण येथे केले.

पैठण येथे आज महिला मतदारांचा मेळावा घेण्यात आला. पैठण फुलंब्रीच्या उपविभागीय अधिकारी नीलम बाफना, तहसिलदार स्वप्निल चव्हाण, शिक्षक, नोडल अधिकारी, महिला अंगणवाडी सेविका, विविध  सामाजिक संस्थेच्या महिला पदाधिकारी, निवडणुकीच्या कामकाजात सहभागी सर्व अधिकारी कर्मचारी यांची उपस्थिती होती.

जिल्हाधिकारी म्हणाले की, महिलांनी स्वयंस्फूर्तीने मतदानाविषयी जागृती करावी  तसेच स्वतः मतदान करावे. आपल्या देशाचे स्वातंत्र्य मिळविण्यासाठी अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी आपले  बलिदान दिले. आणि आज आपण ज्या स्वातंत्र्याच्या उपभोग घेत आहोत ती लोकशाही अस्तित्वात आणली. या लोकशाहीचे महतत्त्व अबाधित ठेवण्यासाठी प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजावणे आवश्यक आहे. देशातील मतदार संख्येच्या निम्मे संख्या ही महिला मतदारांची असून महिला मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावून कर्तव्य पार पाडावे. ज्यांच्या कडेवर लहान बाळ आहे अशा महिला मतदारांच्या लहान बाळांना सांभाळण्यासाठी पाळणाघराची व्यवस्था मतदान केंद्रावर उभारण्यात येत आहे. त्यामुळे कोणतीही चिंता न बाळगता आपण मतदानाला जावे असे आवाहन जिल्हाधिकारी स्वामी यांनी उपस्थित महिलांना केले.

स्थानिक कलावंत अंकुश बनसोडे यांनी ‘चला मतदानाला जाऊया’  हे मतदान जागृती गीत सादर केले.  तर अब्दुल कादर उर्दू हायस्कूल येथील विद्यार्थ्यांनी पथनाट्याद्वारे मतदारजागृती चा संदेश दिला.