ज्येष्ठ रंगकर्मी राजाभाऊ मोरे यांच्या निधनाने हौशी रंगकर्मींचा आधारवड हरपला – मंत्री सुधीर मुनगंटीवार

मुंबई: अमरावती येथील ज्येष्ठ रंगकर्मी राजाभाऊ मोरे यांच्या निधनाने हौशी रंगकर्मींचा आधारवड हरपल्याची शोकभावना सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली आहे.
रंगदेवतेचा वास असलेल्या नाट्यगृहात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दिग्दर्शक, नेपथ्यकार म्हणून हौशी व प्रायोगिक रंगभूमीची दीर्घकाळ सेवा श्री.मोरे यांनी केली. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या अमरावती शाखेची स्थापना करून त्या माध्यमातून त्यांनी अव्याहतपणे रंगसेवा केली. गणेशोत्सवात त्यांनी उभारलेले आकर्षक देखावे अमरावतीकरांच्या कायम स्मरणात राहतील. राज्य नाट्य स्पर्धा हा त्यांचा श्वास होता. राज्य नाट्य स्पर्धा त्यांनी दीर्घकाळ गाजविली. या निष्ठावान रंगकर्मीच्या निधनाने नाट्यक्षेत्राची अपरिमित हानी झाली असल्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.