IND Vs SL: संजू सॅमसन दुखापतीमुळे संघातून बाहेर, त्याच्या जागी विदर्भाच्या ‘या’ खेळाडूला मिळाली संधी

WhatsApp Group

टीम इंडियाचा यष्टिरक्षक फलंदाज संजू सॅमसन दुखापतीमुळे श्रीलंकेविरुद्धच्या उर्वरित टी-20 मालिकेतून बाहेर पडला आहे. मुंबईत खेळल्या गेलेल्या पहिल्या टी-20 सामन्यादरम्यान सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करताना संजू जखमी झाला. त्याच्या डाव्या गुडघ्याला दुखापत झाली आहे. निवडकर्त्यांनी संजूच्या जागी विदर्भाचा यष्टीरक्षक फलंदाज जितेश शर्माचा समावेश केला आहे, जो आयपीएलमध्ये पंजाब किंग्जचा भाग आहे.

बीसीसीआयने एक प्रसिद्धीपत्रक जारी करून याबाबत माहिती दिली आहे. संजूच्या स्कॅननंतर बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकातील तज्ञ डॉक्टरांनी त्याला विश्रांतीचा सल्ला दिला असून त्याच्या उपचारासाठी त्याला पुनर्वसनात जावे लागेल.

भारतीय संघाला या तीन सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना गुरुवारी पुण्यात खेळायचा आहे. टीम इंडियाने सध्या या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात त्यांनी श्रीलंकेचा 2 धावांनी पराभव केला.

या सामन्यातील संजू सॅमसनच्या कामगिरीबद्दल सांगायचे तर तो फलंदाजीत फ्लॉप ठरला. रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या अनुपस्थितीत संजूला चौथ्या क्रमांकावर फलंदाजीची संधी मिळाली. मात्र तो 6 चेंडूत केवळ 5 धावा करून बाद झाला.

दुसरीकडे, पहिल्यांदा भारतीय संघात निवड झालेल्या जितेश शर्माबद्दल बोलायचे झाले तर, त्याने आयपीएल आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये एकूण 76 टी-20 सामने खेळले आहेत. येथे त्याने 1787 धावा केल्या आहेत ज्यात 1 शतक आणि 9 अर्धशतकांचा समावेश आहे. त्याचा स्ट्राइक रेट 147.93 आहे. जर आपण फक्त आयपीएलबद्दल बोललो, तर त्याने 12 सामन्यांमध्ये केवळ 234 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये एकही शतक किंवा अर्धशतक समाविष्ट नाही.