आयर्लंड संघाला मोठा धक्का; भारताविरुद्धच्या मालिकेपूर्वी कर्णधाराने घेतली निवृत्त

WhatsApp Group

आयर्लंडचा दिग्गज खेळाडू विल्यम पोर्टरफिल्डने (William Porterfield) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. आयर्लंडला भारताविरुद्ध टी-20 मालिका खेळायची आहे अशा वेळी त्याने निवृत्ती जाहीर केली आहे. 37 वर्षीय विल्यम पोर्टरफिल्डची आंतरराष्ट्रीय कारकीर्द 16 वर्षांची होती. या काळात त्याने आयर्लंडकडून 200 हून अधिक सामने खेळले आहेत. तो आयर्लंडचा सर्वात यशस्वी कर्णधारही होता.

पोर्टरफिल्ड हा आयर्लंडसाठी वनडेत सर्वाधिक धावा करणारा दुसरा खेळाडू आहे. फक्त केविन ओब्रायनने त्याच्यापेक्षा जास्त धावा केल्या आहेत. आयर्लंडला 26 आणि 28 जून रोजी भारताविरुद्ध टी-20 सामने खेळायचे आहेत.

विल्यम पोर्टरफिल्ड याने क्रिकेटमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे. 2007 च्या विश्वचषकात आयर्लंडने पाकिस्तानचा पराभव केला तेव्हा पोर्टरफील्ड हा संघाचा युवा खेळाडू होता. पण चार वर्षांनंतर जेव्हा आयर्लंडने विश्वचषकात पुन्हा गौप्यस्फोट केला तेव्हा संघाची कमान पोर्टरफिल्डच्या हाती होती. 2011 च्या विश्वचषकात आयर्लंडने त्याच्या नेतृत्वाखाली इंग्लंडचा पराभव केला होता.

पोर्टरफिल्डने 212 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आणि त्यातील 172 सामन्यांमध्ये कर्णधारपद भूषवले आहे. पोर्टरफिल्डने सर्वाधिक 148 एकदिवसीय सामने खेळले आहेत. त्याने 61 टी-20 सामने आणि 3 कसोटी सामनेही खेळले आहेत.पोर्टरफिल्डने 148 एकदिवसीय सामन्यांमध्ये 4343 धावा केल्या आहेत. यामध्ये 11 शतकांचा समावेश आहे. त्याने 61 टी-20 सामन्यात 1079 धावा केल्या आहेत. आयर्लंड हा कसोटी प्रकारातील सर्वात नवीन संघ आहे. यामुळे पोर्टरफिल्ड फक्त 3 कसोटी सामने खेळू शकला.