IND vs ENG: विराट कोहली तिसरा कसोटी सामना खेळणार का? राहुल द्रविडने दिली मोठी अपडेट

WhatsApp Group

India vs England 3rd Test: भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांनंतर दोन्ही संघ 1-1 ने बरोबरीत आहेत. टीम इंडियाने मालिकेतील दुसऱ्या सामन्यात दमदार पुनरागमन करत इंग्लंडचा 106 धावांनी पराभव केला. विशाखापट्टणममध्ये संघाच्या विजयामुळे विराट कोहली इंग्लंडविरुद्धच्या उर्वरित तीन कसोटी सामन्यांसाठी टीम इंडियात सामील होणार की नाही असा प्रश्न चाहत्यांमध्ये निर्माण झाला होता. मालिका सुरू होण्यापूर्वी विराट कोहलीचे नाव संघात होते, मात्र वैयक्तिक कारणांमुळे त्याने आपले नाव मागे घेतले. मात्र, टीम इंडियाने केवळ दोनच सामन्यांसाठी संघ जाहीर केला होता. आता उर्वरित तीन सामन्यांसाठी संघ जाहीर व्हायचा आहे. दरम्यान, टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी विराट कोहलीच्या पुनरागमनावर आपले मत मांडले आहे.

विराट कोहलीचा जवळचा मित्र आणि दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेटपटू एबी डिव्हिलियर्सने खुलासा केला होता की अनुष्का शर्माच्या प्रेग्नंसीमुळे विराटने माघार घेतली आहे.  इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये टीम इंडियाचा विजय झाल्यानंतर विराट पुढच्या टेस्टमध्ये खेळणार का नाही? याबाबत टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांना विचारण्यात आलं.

‘हा प्रश्न तुम्ही निवड समितीला विचारलात तर चांगलं होईल. तेच या प्रश्नाचं उत्तर द्यायला योग्य असतील. काही दिवसांमध्येच टीमची घोषणा होईल, आम्ही त्याच्याशी बोलू आणि कमबॅक कधी करणार याची माहिती घेऊ,’ असं राहुल द्रविड यांनी सांगितलं. बीसीसीआयने इंग्लंडविरुद्धच्या दोन टेस्ट मॅचसाठी टीम इंडियाची घोषणा केली होती. आता दुसरी टेस्ट संपल्यामुळे लवकरच उरलेल्या तीन टेस्टसाठी टीम इंडियाची निवड होईल.

भारताने दुसरा कसोटी सामना 106 धावांनी जिंकला

या मालिकेतील दुसरा कसोटी सामना विशाखापट्टणम येथील विझाग स्टेडियमवर खेळला गेला. टीम इंडियाने हा सामना 106 धावांनी जिंकला. या सामन्यात भारतीय संघ सुरुवातीपासूनच चांगल्या फॉर्ममध्ये दिसत होता. फलंदाजीपासून गोलंदाजीपर्यंत भारतीय खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली. या सामन्यात जसप्रीत बुमराहने गोलंदाजीमध्ये तर यशस्वी जैस्वाल आणि शुभमन गिलने फलंदाजीत अप्रतिम कामगिरी केली.

भारतीय संघाने पहिल्या डावात 396 धावा केल्या होत्या. ज्यामध्ये यशस्वी जैस्वालने द्विशतक झळकावले होते. जैस्वालने पहिल्या डावात २०९ धावांची खेळी केली होती. याशिवाय टीम इंडियाने दुसऱ्या डावात 255 धावा केल्या होत्या. टीम इंडियाकडून शुभमन गिलने दुसऱ्या डावात फलंदाजी केली. गिलने शानदार शतक झळकावले आणि दुसऱ्या डावात 104 धावा केल्या. दुसऱ्या सामन्यात वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने दोन्ही डावात 9 विकेट घेतल्या. बुमराहने पहिल्या डावात 6 आणि दुसऱ्या डावात 3 विकेट्स घेतल्या होत्या. आता मालिकेतील तिसरा सामना राजकोटमध्ये १५ फेब्रुवारीपासून खेळवला जाणार आहे. ज्यामध्ये चाहते विराट कोहलीच्या पुनरागमनाची आतुरतेने वाट पाहत आहेत.