विराट कोहली मोडणार क्रिकेटच्या देवाचा हा खास विक्रम? पाहा आकडेवारी

WhatsApp Group

टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली विश्वचषक 2023 मध्ये जबरदस्त फॉर्ममध्ये दिसत आहे. या स्पर्धेत विराट कोहली भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा दुसऱ्या क्रमांकावर आहे. विराटने आतापर्यंत एक शतक आणि दोन अर्धशतकांसह 259 धावा केल्या आहेत. गेल्या सामन्यात विराट कोहलीने बांगलादेशविरुद्ध शानदार शतक झळकावले होते. हे त्याचे एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यातील 48 वे शतक ठरले. आजच्या सामन्यात विराट कोहली एक खास विक्रम आपल्या नावावर करण्याच्या अगदी जवळ आहे.

सचिनच्या विक्रमाची बरोबरी करणार? 

भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्यात विराट कोहली नवा टप्पा गाठण्याच्या अगदी जवळ आहे. विराटने बांगलादेशविरुद्ध एकदिवसीय कारकिर्दीतील 48वे शतक झळकावले होते. आता विराट सचिन तेंडुलकरच्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 49 शतकांच्या विक्रमापेक्षा फक्त एक शतक मागे आहे. विराटने न्यूझीलंडविरुद्ध शतक झळकावल्यास त्याच्या नावावर एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 49 शतके होतील आणि तो एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 49 शतके करणारा सचिननंतरचा दुसरा खेळाडू ठरेल.

दुसरीकडे, विराटच्या नावावर श्रीलंकेचा माजी दिग्गज खेळाडू सनथ जयसूर्याचाही विक्रम आहे जो तो मोडू शकतो. विराटने न्यूझीलंडविरुद्ध 88 धावा केल्या तर तो एकदिवसीय सामन्यांमध्ये धावांच्या बाबतीत जयसूर्याला मागे टाकेल. एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जयसूर्याच्या नावावर 13,450 तर विराटच्या नावावर 13,342 धावा आहेत.

आजच्या सामन्यासाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणाला मिळणार संधी?

रोहित शर्मा प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणत्या खेळाडूंचा समावेश करणार हा आजच्या सामन्यापुढे सर्वात मोठा प्रश्न आहे. कारण दुखापतीमुळे हार्दिक पंड्या या सामन्यात खेळू शकणार नाही, त्यानंतर आज संघाच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये बदल होणार आहे. भारतासाठी हे खूप महत्वाचे आहे, जर आज आम्ही जिंकलो तर टीम इंडियासाठी सेमीफायनलचा मार्ग सोपा होईल. पण सध्या टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनबाबत अडचण निर्माण झाली आहे.

काल सराव सत्रादरम्यानही संघासाठी वाईट बातमी आली. कारण सूर्यकुमार यादव सरावादरम्यान जखमी झाला, तर दुसरीकडे इशान किशनला मधमाशीने दंश केला. त्यानंतर या दोन्ही खेळाडूंना मैदान सोडावे लागले. सूर्यकुमार बरा असेल तर प्लेइंग इलेव्हनमध्ये त्याचे खेळणे जवळपास निश्चित मानले जात आहे. याशिवाय गोलंदाजी विभाग आणखी मजबूत करण्यासाठी मोहम्मद शमीचा प्लेईंग इलेव्हनमध्ये समावेश केला जाऊ शकतो.