पुणे – महाराष्ट्रात पर्यायी इंधन वाहन उत्पादन करणाऱ्या उद्योगांसाठी अनुकूल वातावरण आहे. उद्योग स्थापनेतील अडचणी दूर करून उद्योजकांना इथे यावेसे वाटेल अशा सुविधा देण्यात येतील, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.
पुणे येथे आयोजित पर्यायी इंधन क्षेत्रातील उद्योजक आणि गुंतवणूकदारांच्या परिषदेच्या उदघाटनप्रसंगी दूरदृश्य प्रणालीद्वारे ते बोलत होते. कार्यक्रमाला नीती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार, उद्योगमंत्री सुभाष देसाई, ऊर्जामंत्री नितीन राऊत, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, पर्यावरण राज्यमंत्री आदिती तटकरे (दूरदृश्य प्रणालीद्वारे), परिवहन विभागाचे अपर मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. अनबलगन, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज ॲण्ड ॲग्रीकल्चरचे अध्यक्ष सुधीर मेहता आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, पर्यायी इंधनासारखे पर्याय जनतेला हवे आहेत, त्यासाठी असे उद्योग पुढे येणे गरजेचे आहे. उद्योग सुरू करण्यासाठी अडथळे आल्यास विकासाची गती मंदावते. हे लक्षात घेऊनच शासन स्तरावर उद्योगांना अनुकूल वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी पावले उचलली जात आहेत. महाराष्ट्र हे नेहमी पुढे जाणारे आणि देशाला दिशा दाखविणारे राज्य आहे. इथल्या विकासाचे देशभरात अनुकरण केले जाते. पर्यायी इंधनाच्या क्षेत्रातदेखील महाराष्ट्र लौकिकास साजेशी कामगिरी करेल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
कोरोनाप्रमाणे प्रदूषणदेखील हानिकारक आहे. जगभरात पर्यावरण बदलामुळे होणारे गंभीर परिणाम दिसून येत आहेत. हे टाळण्यासाठी पर्यावरणाची हानी न होऊ देता शाश्वत विकासावर भर देणे आवश्यक आहे. पर्यावरणाची अधिक हानी होऊ न देता दीर्घकाळ टिकेल असा शाश्वत विकास करण्यासाठी पर्यायी इंधनाचा विचार करणे गरजेचे असून पर्यायी इंधन परिषदेच्या माध्यमातून राज्यभरात पर्यायी इंधनावरील वाहने पोहोचवावी, असे आवाहन त्यांनी केले.
पर्यावरण, उद्योग आणि ऊर्जा विभागाने परिषदेच्या आयोजनासाठी घेतलेल्या पुढाकाराबद्दल अभिनंदन करताना मुख्यमंत्री म्हणाले, पर्यावरणपूरक शाश्वत विकासासाठी हे भविष्याच्यादृष्टीने मोठे पाऊल आहे. अनेक वर्षे वापरात असणाऱ्या इंधनाचा पर्याय शोधून त्याला वापरात आणणे सोपे काम नाही. यासाठी व्यापक जनजागृतीची गरज आहे. त्यासोबत मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. परिषदेच्या माध्यमातून या दोन्ही गोष्टी घडत असून नागरिकांना त्याचठिकाणी वाहन खरेदी करण्याची सुविधा असणे ही चांगली बाब आहे. राज्यातील इतरही शहरात अशा परिषदांचे आयोजन करण्यात यावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.