सिंधुदुर्ग – जिल्ह्यातील वाभवे-वैभववाडी या नगरपंचायवर कोणाची सत्ता येणार याची उत्सुकता साऱ्यांनाच लागली आहे. सत्तास्थान आपल्याकडे काबीज करण्यासाठी राजकीय पक्षांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे. वैभववाडी चा गड कोण राखणार ? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
वैभववाडी ग्रामपंचायतीचे २०१५ मध्ये नगरपंचायतमध्ये रूपांतर झाले. १७ नगरसेवकांचीही नगरपंचायत स्थापन झाली. नगरपंचायतीच्या या पहिल्याच निवडणुकीत काँग्रेस विरुद्ध युती अशी जोरदार लढत आपल्याला पाहायला झाली होती. त्यावेळेचे काँग्रेसचे आमदार आमदार नितेश राणेंविरुद्ध युती लढत झाली होती. या लढतीत काँग्रेसचे ७ नगरसेवक आमदार राणे यांनी निवडून आणले होते, तसेच दोन अपक्ष नगरसेवकांनी काँग्रेसमध्ये प्रवेश घेत सत्ता स्थापन केली. त्यावेळी भाजपा व शिवसेना एकत्र लढली होती या निवडणुकीत भाजपचे ६ तर शिवसेनेचे २ नगरसेवक निवडून आले होते. राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर लढली होती. मात्र त्यांची पूर्ण धूळधाण झाली होती. त्यानंतर नगरपंचायत राजकारणात अनेक उलथापालथी झाल्या होत्या शिवसेना नगरसेवकांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करत बहुमत आणखी बळकट केले त्यानंतर विधानसभा निवडणुकीपूर्वी २०१९ मध्ये स्वतः आमदार नितेश राणे यांनी भाजपामध्ये प्रवेश केला व नगरपंचायत शतप्रतिशत भाजपा झाली. एक हाती सत्ता मिळवून भाजपने नगरपंचायतीवर वर्चस्व मिळवले. त्यानंतर बऱ्याच घडामोडी घडल्या.
जगभरात आलेल्या कोरोना संकटामुळे नगर पंचायतीची निवडणूक लांबली. या नगरपंचायतीची मुदत नोव्हेंबर २०२० मध्येच संपली आहे. मात्र लॉकडाऊन मुळे वर्षभर नगरपंचायती वर प्रशासकाची नेमणूक झाली. या दरम्यान भाजपाच्या माजी नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे शहरात दुबळ्या असलेल्या शिवसेनेचे वजन वाढले. त्यामुळे या वर्षीची नगरपंचायतीची खरी लढत शिवसेना विरुद्ध भाजपा अशीच होणार आहे भाजपाला तगडे आव्हान देण्यासाठी सेना सज्ज झाली आहे.
मात्र राज्यात महाविकास आघाडी म्हणून भाजपाशी दोन हात करणाऱ्या शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या महाविकास आघाडी यांचा सूर काही उमगला नाही. काँग्रेसने नगरपंचायत निवडणूक स्वबळावर लढण्याचे जाहीर केले. त्यामुळे आघाडी होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. परंतु राष्ट्रवादी कॉग्रेस व शिवसेना आघाडी म्हणून ही निवडणूक लढणार आहेत. त्यामुळे नगरपंचायत निवडणुकीपूर्वीच वैभववाडीत सर्व पक्षांकडून जोरदार तयारी सुरू केली असून दिवसेंदिवस वैभववाडी नगरपंचायती साठी राजकारण तापू लागले आहे. त्यामुळे या रणसंग्रामात कोणाची रणनीती यशस्वी ठरणार आहेत ते येत्या २२ डिसेंबरला कळणार आहे.