पुढच्या आयपीएलमध्ये धोनी खेळणार का? पाहा काय म्हणाला धोनी!

WhatsApp Group

चेन्नई –  इंडियन प्रीमियर लीगमध्ये (IPL) चेन्नईसाठी खेळणारा आणि भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीबाबत एक बातमी समोर आली आहे. पुढील आयपीएलमध्ये सहभागी होणार की नाही, याबाबत सध्यातरी आपण कोणताही विचार केला नसल्याचे CSK चा कर्णधार एमएस धोनीने म्हटले आहे.

चेन्नईतील एका कार्यक्रमात धोनी म्हणाला की, आयपीएलच्या पुढच्या मोसमाला अजून बराच वेळ आहे. अशावेळी काहीही होऊ शकते, निवृत्तीचा निर्णय घेण्यासाठी अजून बराच वेळ माझ्याकडे आहे. पुढील आयपीएल 2022 एप्रिल महिन्यात होणार आहे. त्यामुळे निर्णय घेण्यासाठी भरपूर वेळ असेल असं तो म्हणाला.

महेंद्रसिंग धोनीने 15 ऑगस्ट 2020 रोजी सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. त्यानंतर तो आयपीएलमध्ये खेळत राहिला. धोनी आयपीएलमधील चेन्नई सुपर किंग्ज संघाचा कर्णधार आहे. अलीकडेच त्याने आपल्या संघाला 2021 आयपीएलचे विजेतेपद जिंकून दिले आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जने आजवर 4 वेळा आयपीएल आपल्या नावावर केले आहे. तर सर्वाधिक वेळा आयपीएल जिंकण्याचा विक्रम मुंबई इंडियन्सच्या नावावर आहे. मुंबईने सर्वाधिक पाच वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे. सर्वाधिक विजेतेपद जिंकण्याच्या यादीत मुंबईच्या खालोखाल चेन्नईच्या संघाचा नंबर लागतो.

IPL फायनलनंतर काय म्हणाला होता धोनी?

आयपीएल 2021 चा हंगाम कोरोनामुळे यूएईमध्ये खेळवला गेला. 15 ऑक्टोबर रोजी झालेल्या अंतिम सामन्यात चेन्नईने कोलकाता नाईट रायडर्सचा पराभव करून विजेतेपद पटकावले. सामन्यानंतर समालोचक हर्षा भोगले यांनी धोनीला विचारले की तु पुढील आयपीएल हंगामात पुन्हा खेळताना दिसणार आहे का? यावर धोनी म्हणाला, मी जे बोललो ते मला पुन्हा सांगायचे आहे, ते बीसीसीआयवर अवलंबून असेल. पुढच्या हंगामात दोन नवीन संघ येणार आहेत, त्यामुळे चेन्नई सुपर किंग्ज संघासाठी काय चांगले आहे हे आम्हाला ठरवायचे आहे. संघाला चांगलं योगदान कसं मिळेल याकडे लक्ष असेल.