अश्विनला अफगाणिस्तानविरुद्ध संधी मिळणार? फलंदाजी प्रशिक्षकानं दिलं उत्तर
अबू धाबी – आयसीसी टी20 विश्वचषकामध्ये बुधवारी भारताचा महत्त्वाचा सामना आहे. सलग दोन पराभवानंतर टीम इंडिया आता अफगाणिस्तानशी भिडणार आहे. सेमीफायनलच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी टीम इंडियाला या सामन्यात मोठ्या फरकाने विजय मिळवावा लागेल. अशा परिस्थितीत टीम इंडिया आपल्या प्लेइंग-11 मध्ये काही बदल करणार का, हा प्रश्न कायम आहे.
भारतीय क्रिकेट संघाचे फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड यांनी अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यापूर्वी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांना रविचंद्रन अश्विनच्या खेळण्याच्या संदर्भात प्रश्व विचारण्यात आला, तेव्हा त्यांनी उत्तर दिलं की प्लेइंग-11 अद्याप ठरलेला नाही. अशा परिस्थितीत सर्व खेळाडू निवडीसाठी हजर असतील.
रविचंद्रन अश्विनला पाकिस्तान, न्यूझीलंडविरुद्ध संधी देण्यात आली नव्हती. या निर्णयावर अनेक प्रश्न उपस्थित केले गेले, आता टीम इंडियाने सलग दोन सामने गमावले आहेत आणि सध्याचे कॉम्बिनेशन काही चमत्कार करू शकलेले नाही, अशा परिस्थितीत प्लेइंग-11 मध्ये बदल अपेक्षित आहे.
टीम इंडियाने पाकिस्तान, न्यूझीलंडविरुद्धच्या दोन सामन्यात केवळ 2 विकेट्स घेतल्या आहेत. जसप्रीत बुमराहने दोन्ही विकेट घेतल्या आहेत, त्यामुळे भारतीय गोलंदाजी पूर्णपणे अपयशी ठरत आहे. विशेषतः वरुण चक्रवर्तीने निराशा केली आहे. त्याच्या आयपीएलमधील कामगिरीच्या जोरावर त्याची टी20 विश्वचषकात निवड झाली होती.
रविचंद्रन अश्विनशिवाय राहुल चहरलाही अद्याप संधी मिळालेली नाही. युजवेंद्र चहलच्या जागी राहुल चहरचा टी20 विश्वचषकाच्या संघात समावेश करण्यात आला होता, तेव्हाही बराच वाद झाला होता. अशा स्थितीत आता त्याला अफगाणिस्तानविरुद्ध संधी मिळते का हे पाहावे लागेल.
भारतीय संघ – विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), केएल राहुल, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), इशान किशन, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, राहुल चहर, रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, वरुण चक्रवर्ती , जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी
राखीव खेळाडू- श्रेयार अय्यर, दीपक चहर, अक्षर पटेल