कुडाळ : प्रियकराशी असलेल्या अनैतिक संबंधात पतीचा असलेला अडथळा दूर करण्यासाठी पत्नीनेच प्रियकर व त्यांच्या दोन भाच्यासह आपल्या पतीचा निर्घृण खून केला. हा खून लपविण्यासाठी आत्महत्येचा बनाव रचला. पूर्वनियोजित कट रचून शिवा उर्फ शिवाप्पा कृष्णाप्पा नायक (28, सध्या रा. मारुती मंदिरजवळ कुडाळ, मूळ रा. विजापूर, राज्य कर्नाटक) याला जीवे ठार मारून राहत्या घरी गळफास घेतल्याचा बनाव करून खुनाचा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पत्नी सुनंदा उर्फ सोनाली शिवाप्पा नायक (25, सर्व सध्या राहणार कुडाळ, मूळ रा. काळगीतांडा, विजापूर) व तिचा प्रियकर सिताराम बाबू राठोड (30) यासह अन्य दोघांवर कुडाळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पत्नी सुनंदा हिला कर्नाटक येथून अटक करून कुडाळ न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 16 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.
दरम्यान यातील अन्य तिघेजण फरार असून यातील एका संशयितांची मालवाहक गाडी पोलिसांनी जप्त केली आहे. पोलिसांना असलेला संशय व पत्नीची व्हायरल झालेली ऑडीओ क्लिप यावरून या खुनाचा कट उघड झाल्याची माहिती कुडाळ पोलिस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी दिली.
कुडाळ शहरामध्ये भाजी विक्रीचा व्यवसाय करणारा शिवा उर्फ शिवाप्पा कृष्णाप्पा नायक याने आपल्या राहत्या घरात आत्महत्या केल्याची फिर्याद शिवा नायक हिच्या बहिणीने कुडाळ पोलिसात दिली होती. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जात पंचनामा करत तशी आत्महत्येची नोंद दाखल केली होती. यानंतर मयत शिवा याच्यावर विजापूर येथील गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र कुडाळ शहरात याबाबत उलटसुलट चर्चा सुरू होती. 4 जानेवारी रोजी शिवाच्या भावाने या आत्महत्येबाबत संशय व्यक्त करणारा एक अर्ज कुडाळ पोलिसांकडे दिला होता. यानंतर कुडाळ पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. दरम्यानच्या काळात पोलिसांच्या हाती पत्नी सुनंदा हिची एका व्यक्तीबरोबर झालेली चर्चेची एक ऑडिओ क्लिप हाती लागली. मात्र ही ऑडिओ क्लिप त्यांच्या बंजारी भाषेत असल्याने पोलिसांना या तपास कामात अडथळा येत होता. यासाठी पोलिसांनी संबंधित भाषा जाणणार्या दोन प्रतिष्ठित व्यक्तींची मदत घेऊन त्याचे भाषांतर केले. हे भाषांतर ऐकल्यानंतर पोलिसांच्या संशयाचे रूपांतर पुराव्यात झाले. यानंतर पोलिसांनी पत्नी सुनंदा हिच्या गावी जात तिला ताब्यात घेतले. त्या ठिकाणी तिच्या समाजातील काही लोकांनी कांगावा करत ताब्यात घेण्यास विरोधही केला.
मंगळवारी तिला कुडाळ पोलिस स्टेशन येथे आणत याबाबत चौकशी केली. सुरुवातीला तिने पोलिसांना वेगवेगळ्या बतावण्या केल्या. मात्र पोलिसांनी हिसका दाखवताच तिने आपण प्रियकराच्या मदतीने पतीचा खून केल्याची कबुली दिली. तिने दिलेल्या जबाबानुसार 25 डिसेंबर रोजी दुपारी 2.30 वा. प्रियकर सिताराम राठोड यांनी सुनंदाला फोन करून आज रात्री शिवा नायकचा काटा काढायचा असे सांगितले. यानंतर या दोघांमध्ये हे कृत्य कसे करायचे? याबाबत चर्चा झाली. त्यानुसार सिताराम राठोड हा आपले दोन भाचे अजित चव्हाण व आदिक चव्हाण यांच्यासह घरी आला. यातील सितारामने त्याचे पाय पकडले व अन्य दोघांपैकी एकाने जाड कापडाने शिवाचे नाक व तोंड दाबले तर दुसर्याने दोरीने गळा आवळला. यानंतर हे तिघेही घटनास्थळावरून निघून गेले. यानंतर पत्नीने आपल्या प्रियकराला वाचवण्यासाठी व तिच्या समोर झालेला खून लपविण्यासाठी पतीने आत्महत्या केल्याचा बनाव रचला. या घटनेमध्ये शिवा नायक हा साडीच्या फासावर लटकलाच नव्हता. त्याने आत्महत्या केली असे दिसावे यासाठी किचनमध्ये साडीचा केवळ नामधारी गळफास तयार केला होता.
याबाबत उलटसुलट चर्चा सुरू असताना पोलिसांचाही संशय बळावला होता. आत्महत्येचा बनाव रचल्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले होते. त्यावेळी पत्नीने आपण स्वतःच पती शिवाला गळफासावरून खाली उतरवले असे सांगितले. मात्र एकटी महिला एका वजनशीर व्यक्तीला खाली उतरू शकत नाही. यावरून पोलिसांचा प्रथमदर्शनी संशय बळावला होता. यानंतर शिवा याच्या भावाने दाखल केलेली तक्रार व पोलिसांच्या हाती लागलेली सुनंदाची ऑडिओ क्लिप यावरून पोलिसांचा संशय अधिकच बळावला व त्यानंतर तपासाची चक्रे वेगाने फिरवत संशयित पत्नीला पोलिसांनी ताब्यात घेतले.
दरम्यान, पोलिसांनी प्रियकर सिताराम याची व्यवसायासाठी वापरलेली मालवाहतूक गाडी जप्त केली आहे. फरार झालेल्या या तिघांचाही कुडाळ पोलिस कसून तपास घेत असून लवकरच ते आपल्या हाती लागतील असा विश्वास पोलिस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी व्यक्त केला. मयत शिवाची पत्नी सुनंदा हिला कुडाळ न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 16 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. या विषयामध्ये अन्य कोणाचा हात आहे का, तसेच इतर विषयांवर सखोल तपास करता यावा यासाठी पोलिसांनी न्यायालयाकडे सात दिवसांची पोलिस कोठडी मागितली होती. या घटनेत पतीचा प्रियकराच्या मदतीने पूर्वनियोजित कट रचून खून केल्याप्रकरणी कुडाळ पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 103 (1),238,62(2)(ए) प्रमाणे सिताराम बाबू राठोड( 30), अजित अशोक चव्हाण (21), अदिक अशोक चव्हाण (19), सुनंदा उर्फ सोनाली शिवाप्पा नायक (25) या चौघांवर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेची फिर्याद पोलिस हवालदार सचिन गवस यांनी दिली. घटनेचा अधिक तपास पोलिस निरीक्षक राजेंद्र मगदूम करत आहेत.
व्हायरल क्लिपचा सुगावा लागताच तिघे पसार
पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत पत्नी सुनंदाला ताब्यात घेतल्यावर धक्कादायक हकीगत पोलिसांसमोर आली. दरम्यान याबाबत शहरात उलटसुलट सुरू असलेली चर्चा व व्हायरल झालेले क्लिप याचा प्रियकर सिताराम व इतर दोन संशयित यांना मागमूस लागताच ते तिघेही फरार झाले आहेत. हे तिघेही मयत शिवा याच्या अंत्यसंस्कारालाही होते. मात्र यानंतर संशयाचे वातावरण तयार झाल्यावर ते तिघेही पळून गेले आहेत.