
पूर्वीच्या काळी स्त्रियांना मासिक पाळी आली की, कावळा शिवला, पाटावर बसली किंवा एका विशिष्ट ठरवून दिलेल्या खोलीमध्ये तिला राहावे लागत असे परंतु, बदलेल्या जीवनशैलीनुसार सध्या मासिक पाळीबद्दल सहजरित्या चर्चा होते.
मासिक पाळीच्या काळात महिलांना स्वच्छतेचे महत्त्व कळावे हा या मागचा मुख्य उद्देश. खेड्यापाड्यामध्ये आणि शहरांमधील काही भागात राहणाऱ्या लाखो महिलांना आजही यासंबंधीच्या अनेक महत्त्वाच्या बाबी माहित नाही आणि त्यांच्या थोड्याशा निष्काळजीपणामुळे त्यांना अनेक गंभीर आजारांना सामोरे जावे लागते. याचा परिणाम स्त्रियांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर होत असतो.
‘जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिवस’ साजरा करण्यामागचा उद्देश तरुण मुलींनी आणि महिलांनी मासिक पाळीच्या वेळी शरीराच्या स्वच्छतेची काळजी (Care) कशी घ्यावी व त्यावर योग्य ती चर्चा करुन स्वत:चे आयुष्य सुरक्षित कसे ठेवता येईल याविषयी त्यांच्यामध्ये जागरुकता कशी निर्माण करता येईल हा त्यामागचा उद्देश आहे.
आजही जगभरात (World) अनेक स्त्रिया अशा आहेत ज्या याविषयावर सहजपणे बोलू शकत नाही. त्यामुळे त्यांना मासिक पाळीच्या वेळी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्या त्यामुळे कोणत्या प्रकारची समस्या कशामुळे उद्भवू शकते, स्वच्छतेच्या मदतीने कोणते आजार टाळता येतात आदीची माहिती त्यांना मिळत नाही. मासिक पाळी दरम्यान स्वच्छतेवर अधिक भर द्यायला हवा. याकाळात स्वच्छता न राखल्यास इन्फेक्शनचा धोका आहे. तसेच अनेक महिलांच्या इनफर्टिलिटी संबंधी अडचणी निर्माण होऊ शकतात. हेपेटायटीस बी, गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग, योनीमार्गाचा संसर्ग यांसारख्या गंभीर आजारांकडे ढकलू शकते हेही त्यांना माहीत नाही.