
मुंबई: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय राऊत यांनी रविवारी म्हटले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी एकीकडे रशिया-युक्रेन युद्धात मध्यस्थी करतात, मात्र महाराष्ट्र-कर्नाटक सीमा वादात ते लक्ष देत नाहीत. शिवसेना पक्षाचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’मध्ये प्रसिद्ध झालेल्या ‘रोखठोख’ या साप्ताहिक स्तंभात राऊत यांनी लिहिले की, महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील सीमावाद हा दोन राज्यांतील जनता आणि सरकारमधील लढा नसून मानवतेचा लढा आहे. भाषिक आधारावर राज्यांच्या पुनर्रचनेनंतर 1957 पासून सीमावादाचा प्रश्न कायम आहे. पूर्वीच्या बॉम्बे प्रेसिडेन्सीचा भाग असलेल्या बेळगावीवर महाराष्ट्राचा दावा आहे, कारण त्यात मोठ्या प्रमाणात मराठी भाषिक लोकसंख्या आहे. सध्या कर्नाटकचा भाग असलेल्या 814 मराठी भाषिक गावांवरही महाराष्ट्र हक्क सांगतो.
राऊत म्हणाले, “राज्यांच्या पुनर्रचनेत त्यांच्या इच्छेविरुद्ध कर्नाटकात समाविष्ट झालेल्या बेळगावी आणि परिसरातील मराठी भाषिक लोकांचा संघर्ष क्रूरपणे दडपला जाऊ शकत नाही.” केंद्र सरकार आणि सर्वोच्च न्यायालय हे प्रकरण सोडवू शकत नसतील तर मग न्याय मिळणार कुठून? पंतप्रधान मोदी रशिया-युक्रेन युद्धात मध्यस्थी करतात, मात्र महाराष्ट्र-कर्नाटक सीमा वादाकडे ते पूर्णपणे दुर्लक्ष करत आहेत. हे चांगल्या नेत्याचे लक्षण नाही. असं संजय राऊत म्हणाले.
संसदेने तोडगा काढला तर काय नुकसान?
राज्यसभा सदस्य राऊत म्हणाले की, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी हा प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेतला ही चांगली गोष्ट आहे, मात्र केंद्र सरकार तटस्थ भूमिका घेणार का?, असा प्रश्न उपस्थित होत आहे. सीमावादावर संसदेने तोडगा काढावा, अशी मागणी त्यांनी केली. राऊत म्हणाले, “सर्वोच्च न्यायालयाने हे प्रकरण संसदेकडे नेण्याची वाट पाहण्याऐवजी, संसदेने त्यावर लवकरात लवकर तोडगा काढला तर काय बिघडणार? असं संजय राऊत म्हणाले.