पंढरपुरात विठोबा कसा प्रकटला याविषयीची सर्वश्रुत कथा पुंडलिक या मातृपितृभक्ताशी संबंधित आहे.पुंडलिकाच्या भेटीसाठी वैकुंठीचा देव विष्णू हा पंढरपुरी आला.‘आईवडिलांची सेवा करतो आहे;ती पूर्ण होईपर्यंत या विटेवर थांब’असे देवाला सांगून पुंडलिकाने एक वीट भिरकावली आणि त्याच विटेवर देव कटी कर ठेवून उभा राहिला,अशी ही कथा आहे.सर्व संतांनी आणि अन्य भाविकांनी मोठ्या श्रद्धेने स्वीकारलेली आहे.भक्तराज,महावैष्णव म्हणून पुंडलिक ओळखला जातो.पंढरपुरात श्रीविठ्ठलाचे दर्शन घेण्यापूर्वी पुंडलिकाचे दर्शन घेण्याचा संकेत आहे.
कृष्णाने द्वारकेत आल्यानंतरही राधेशी असलेली जवळीक सोडली नाही म्हणून रुक्मिणी रुसून उपर्युक्त दिंडीरवनात येऊन राहिली. तिची समजूत काढण्यासाठी कृष्ण हा आपल्या गाईगोपाळांसोबत आला आणि गोपवेष धारण करून रुक्मिणीस भेटावयास गेला. आपला परिवार त्याने पंढरपुराजवळच असलेल्या गोपाळपुरास ठेवला. पंढरपुराजवळ असलेल्या गोपाळपुराला वारकऱ्यांच्या वारीत फार महत्त्व आहे. गोपाळपूर हे एक वाडीवजा गाव आहे, तिथे गोपाळकृष्णाचे मंदिर आहे. त्या मंदिरात भजने गात दिंड्या जातात.
डिंडीरव वनातल्या डिंडीरव या नावाच्या एका दैत्याचा वध करण्यासाठी विष्णूने मल्लिकार्जुन शिवाचे रूप घेतले आणि त्याचा वध केला. पंढरपूर येथे भीमातटी दिंडीरवन म्हणून एक ठिकाण आहे. त्याचा या कथेतील डिंडीरव वनाशी संबंध जोडलेला दिसतो.
या कथांपैकी डिंडीरवाची व द्वारकेतून रुसून पंढरपुराला आलेल्या रुक्मिणीची कथा पाद्म पांडुरंग माहात्म्यात, पुंडलिकाची कथा स्कंद पांडुरंग माहात्म्यात आणि पद्मेची कथा स्कंद आणि पद्म अशा दोन्ही पांडुरंग माहात्म्यात आली आहे. ही पांडुरंग माहात्म्ये पांडुरंगाचे, तसेच पंढरपूरचे महत्त्व सांगणारी संस्कृत पुराणे आहेत।
२८ युगे उभा असणे
१. सत्य, त्रेता, द्वापर आणि कलि अशा चार युगांचे एक चक्र, म्हणजेच एक फेरा होतो. सध्या पृथ्वीतत्त्वाचा सातवा फेरा चालू आहे. ७ x ४ = २८. सध्या २८ वे युगचालू आहे. विठ्ठल २८ युगांपासून उभाच आहे.
२. ४ वेद, १८ पुराणे आणि ६ शास्त्रे यांची बेरीज २८ असणे आणि त्यांनी पांडुरंगाचे गुणगान करणे : ४ वेद, १८ पुराणे आणि ६ शास्त्रे यांची बेरीज २८ होते; म्हणून विठ्ठल ‘युगे अठ्ठावीस’ उभा आहे; कारण हे सर्व (वेद, पुराणे आणि शास्त्रे) त्याचेच गुणगान करणारी आहेत.’
‘विठ्ठल २८ युगांपासून उभा आहे, असे म्हटले आहे. ‘उभा आहे’, याचा अर्थ विठ्ठल २८ युगांपासून निर्गुण स्वरूपात, म्हणजेच तत्त्वरूपाने कार्यरत आहे. यावरून विठ्ठलाचे अनादित्व लक्षात येते.’