Ganesh Visarjan 2022 : बाप्पाचे विसर्जन पाण्यात का करतात? जाणून घ्या

WhatsApp Group

Ganesh Visarjan 2022 : कोविडच्या दोन वर्षांच्या निर्बंधांमुळे यंदा गणेशोत्सवाचा उत्साह काही वेगळाच होता. घरगुती गणपतीसह मंडळाच्या गणपतीमध्येही तो जाणवला. यंदा सर्वच ठीकाणी गणेशोत्सव आनंदाने साजरा करण्यात आला. गणपतीला पाण्यात विसर्जित करण्यात येते. गणपती विसर्जन पाण्यातच का केले जाते या मागे काही धार्मिक करणे आहेत.

हिंदू धर्मात अनेक विधी हे निसर्गाशी निगडीत आहे. निसर्गाशी एकरूपता राखण्याचा संदेश वेगवेगळ्या पद्धतीने कायमच दिला जातो. गणेश विसर्जनाच्या वेळेस विसर्जन हे फक्त मूर्तीचेच करायचे नसते तर आपल्यातील दुर्गुणांचेसुद्धा करायचे असते.

धार्मिक मान्यतेनुसार असे मानले जाते की, महर्षी वेदव्यासांच्या सांगण्यावरून भगवान गणेशाने महाभारत लिहिले आहे. महर्षी वेदव्यास यांनी सलग 10 दिवस गणपतीला महाभारताची कथा सांगितली आणि त्यांनी ही कथा 10 दिवस तंतोतंत लिहिली. 10 दिवसानंतर जेव्हा महर्षी वेदव्यासांनी गणपतीला स्पर्श केला तेव्हा, त्यांना गणपतीच्या शरीराचा अक्षरशः चटका लागला. त्यांच्या शरीराचे तापमान खूप वाढले होते. वेदव्यासांनी त्यांना ताबडतोब जलाशयात डुबकी मारण्यास सांगितली. यामुळे त्यांच्या शरीराचे तापमान सामान्य झाले. तेव्हापासून असे मानले जाते की, गणपतीचे विसर्जन हे त्यांना शीतल करण्यासाठी करण्यात येते.