
अनेक मराठी माणसं स्वतःच सार्वजनिक ठिकाणी हिंदीत बोलू लागली आहेत. मग अशा वेळी जर गुजरात, उत्तर प्रदेश किंवा बिहारहून आलेले लोक आपल्या मातृभाषेला प्राधान्य देत नसतील, तर त्यांना दोष देणं कितपत योग्य आहे?
एक अनुभव येथे सांगावा वाटतो. माझा छत्रपती संभाजीनगरचा मित्र. आम्ही एका पेट्रोल पंपावर गेला होता. तिथे पेट्रोल भरताना त्याने सहज म्हटलं, “भैया, 275 का पेट्रोल भरो.” त्यावर तिथला कर्मचारी – जो स्वतः मराठी होता – त्याने उत्तर दिलं, “मी मराठी आहे, माझ्याशी मराठीत बोला.” हे ऐकून त्या मित्राला क्षणभर लाजही वाटली, आणि मलाही खिन्नता वाटली – की आपण स्वतः आपल्या भाषेचा अवमान करत चाललोय. या प्रसंगातून एक महत्त्वाचा मुद्दा समोर येतो, मराठी भाषा टिकवायची असेल तर आधी मराठीत बोला.
भाषा म्हणजे संस्कृतीची ओळख
मराठी ही केवळ एक भाषा नाही, ती महाराष्ट्राची ओळख आहे. ही ओळख फक्त महाराष्ट्र दिनाच्या भाषणात किंवा राजभाषा दिनाच्या पोस्टरपुरती नको. ती रोजच्या जगण्यात दिसली पाहिजे – रस्त्यावर, दुकानदाराशी, ग्राहकसेवा प्रतिनिधींशी, शाळांमध्ये, कार्यालयांमध्ये. कोणतीही भाषा तेव्हाच जिवंत राहते, जेव्हा ती सातत्यानं वापरली जाते. अन्यथा, ती फक्त अभिजाततेची शोकांतिका बनते.
हिंदी-इंग्रजी गरजेच्या, पण मराठी तितकीच आवश्यक
आजच्या जागतिक युगात हिंदी आणि इंग्रजी या दोन्ही भाषा उपयुक्त ठरतात. पण त्यासाठी मातृभाषेला बाजूला ठेवायचं कारण नाही. दोन्ही एकत्र चालू शकतात – गरज आहे ती प्राधान्याची. मराठीचा वापर हा आपल्या अस्मितेचा भाग आहे. आपण जर आपल्या मातृभाषेला सार्वजनिक ठिकाणी संकोचून वापरणार असू, तर इतर भाषिकांकडून मराठीला आदर कसा मिळेल?
भाषा वाचवायची असेल, तर ती केवळ घोषणांमध्ये किंवा मोर्चांमध्ये नाही, तर रोजच्या जीवनात वापरून जपावी लागेल.
-
तुम्ही ग्राहक असाल, तरीही ग्राहकसेवा प्रतिनिधींशी मराठीत बोला.
-
मुलांना लहानपणापासून मराठीत संवाद साधण्याची सवय लावा.
-
शाळांमध्ये मराठी दिवस साजरा होतो, पण तो एका दिवसापुरता नको – तर संपूर्ण वर्षभर त्या भाषेचा वापर व्हावा.
मराठीत बोला, अभिमानाने बोला.
मराठी फक्त ‘महाराष्ट्र दिन’ किंवा ‘मराठी राजभाषा दिन’पुरती मर्यादित नको राहायला. ती रोजच्या जीवनाचा अविभाज्य भाग असायला हवी. कारण ही भाषा तुमची आहे, तुमच्या जगण्याची ओळख आहे. आणि ही ओळख तुम्हीच टिकवू शकता – रोजच्या वापरातून, संकोच न करता, अभिमानाने.