
T20 World Cup: टीम इंडियाचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे T20 वर्ल्ड कपमधून बाहेर पडला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळासमोर आता जसप्रीत बुमराहच्या जागी खेळाडू निवडण्याचे आव्हान आहे. मोहम्मद शमीला विश्वचषकासाठी बॅकअप खेळाडूंच्या यादीत ठेवण्यात आले असल्याने त्याची निवड होण्याची शक्यता अधिक आहे. मात्र शमीशिवाय बुमराहच्या जागी सिराजलाही ऑस्ट्रेलियात पाठवले जाऊ शकते.
बुमराहच्या जागी निवडीसाठी बीसीसीआयकडे 15 ऑक्टोबरपर्यंत वेळ आहे. पण बीसीसीआय 6 ऑक्टोबरपूर्वी बुमराहच्या बदलीची घोषणा करू शकते. याचे कारण म्हणजे वर्ल्डकपच्या तयारीसाठी टीम इंडिया 6 ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियाला रवाना होणार आहे. अशा परिस्थितीत बुमराहच्या जागी टीम इंडियासोबत ऑस्ट्रेलियालाही पाठवण्यात येणार आहे.
आशिया कपमध्ये गोलंदाजांच्या निराशाजनक कामगिरीनंतर मोहम्मद शमीला टीम इंडियात परत बोलावण्यात आले. पण कोरोना पॉझिटिव्ह असल्याने शमी ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या T20 मालिकेचा भाग होऊ शकला नाही. मात्र, विश्वचषकातील बॅकअप खेळाडूंमध्ये समावेश करण्यात आल्यामुळे बुमराहच्या जागी संघात स्थान मिळवणाऱ्या खेळाडूंच्या यादीत शमीचे नाव आघाडीवर आहे.
शमीशिवाय दीपक चहर आणि मोहम्मद सिराज हे देखील विश्वचषक संघाचा भाग होण्याच्या शर्यतीत आहेत. दीपक चहरला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध T20 मालिका खेळण्याची संधी मिळाली आहे. पहिल्या T20 सामन्यात दीपक चहरने चांगली गोलंदाजी करताना दोन विकेट घेतल्या आणि आपल्या कामगिरीने सर्वांना प्रभावित केले.मोहम्मद सिराजने अलीकडे कौंटी क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली आहे. सिराजलाही ऑस्ट्रेलियन खेळपट्ट्यांवर खेळण्याचा अनुभव आहे. ऑस्ट्रेलियात पदार्पण केल्यापासून सिराजने मागे वळून पाहिले नाही.