
चिपळूण – ही वेळ आव्हानात्मक भाषा वापरण्याची नाही. ही वेळ आहे की, ‘भूला हुवा शाम घर आया, तो उसे भूला नही कहते’ म्हणण्याची आणि कृतीमध्ये उतरविण्याची ही वेळ आहे. ही एकमेकांना आव्हाने – प्रतिआव्हाने देण्याची वेळ नाही, त्याने प्रश्न सुटणार नाही. हा प्रश्न सोडविण्यासाठी बुद्धिचातुर्य वापरा, असा सल्ला आमदार भास्कर जाधव यांनी शिवसेनेचे मुख्य पक्षप्रवक्ते संजय राऊत यांना दिला आहे.
गुहागरचे आमदार भास्कर जाधव शुक्रवारी चिपळूण येथील आपल्या गावी आले असता, त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. संजय राऊत यांनी मुंबईत येऊन आमच्यासोबत बसा, असं ट्वीट केले होते. एकनाथ शिंदे मुंबईत आल्यानंतर त्यांची मनधरणी होऊ शकते का, असा प्रश्न पत्रकारांनी भास्कर जाधव यांना विचारला. त्यावर भास्कर जाधव म्हणाले की, संजय राऊत हे आमचे मुख्य प्रवक्ते आहेत. त्यांना सल्ला देण्याइतका मी मोठा नाही.
संजय राऊत वारंवार प्रसार माध्यमांसमोर येऊन किरीट सोमय्या यांच्याविरोधात बोलायचे, त्यावर भास्कर जाधव यांना विचारले असता ते म्हणाले, काय किरीट सोमय्या घेऊन बसलात? कोण किरीट सोमय्या, असा प्रश्नच त्यांनी यावेळी केला. भारतीय जनता पक्षाने असे १०० सोमय्या सोडलेले आहेत. महाराष्ट्र बघतोय, देश बघतोय असंही ते यावेळी बोलताना म्हणाले.