सुनेत्रा पवारांना ‘या’ खात्यापासून ठेवले लांब; नेमकी कोणती खाती त्यांच्या वाट्याला?

WhatsApp Group

मुंबई | अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांची तातडीची बैठक घेण्यात आली. या बैठकीत पक्षाच्या विधिमंडळ गटनेतेपदी सुनेत्रा पवार यांची एकमताने निवड करण्यात आली. त्यानंतर सायंकाळी राजभवन येथे त्यांचा शपथविधी सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते, आमदार तसेच महायुतीतील वरिष्ठ नेत्यांची उपस्थिती होती. राज्यपालांनी सुनेत्रा पवार यांना महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ दिली.

शपथविधीनंतर सुनेत्रा पवार यांच्याकडे तीन महत्त्वाची मंत्रीपदे सोपवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्याकडे क्रीडा व युवक कल्याण, राज्य उत्पादन शुल्क तसेच अल्पसंख्यांक कल्याण ही खाती देण्यात आली आहेत. मात्र त्यांनी तात्काळ मंत्रालयाचा पदभार स्वीकारणार नसून त्या बारामतीकडे रवाना होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. अजित पवार यांचा दशक्रिया विधी पार पडल्यानंतर त्या अधिकृतपणे कार्यभार स्वीकारणार आहेत.

दरम्यान, अजित पवार यांच्याकडे असलेले अर्थ खाते सुनेत्रा पवार यांच्याकडे देण्यात आलेले नाही. उपलब्ध माहितीनुसार हे खाते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच राहणार असल्याची चर्चा आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील काही नेते अर्थ खाते पक्षाला मिळावे, यासाठी आग्रह धरत असल्याचे बोलले जात आहे.

या पार्श्वभूमीवर अर्थमंत्रीपदावरून महायुतीत मतभेद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भाजप आपला दावा कायम ठेवणार की राष्ट्रवादी काँग्रेसला हे खाते सोपवले जाणार, तसेच खाते मिळाल्यास त्याची जबाबदारी कोणाकडे जाणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे सुनेत्रा पवार या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरल्या असून त्यांच्या या ऐतिहासिक भूमिकेकडे राज्यभरातून विशेष लक्ष दिले जात आहे.