जादूटोणा विरोधी कायद्याचे नियम कधी करणार? दाभोलकर यांच्या शहिद दिनाच्या पार्श्वभूमीवर अंनिसचा शासनाला सवाल

WhatsApp Group

महाराष्ट्र अंनिसचे संस्थापक कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या निर्घृण खुनाला या २० ऑगस्टला नऊ वर्षे पूर्ण होत आहेत. त्यांच्या बलिदानाच्या नंतर तेव्हाच्या सरकारने जादूटोणा विरोधी कायदा महाराष्ट्रात लागू केला होता. ह्यानंतर आज अखेर, महाराष्ट्रात तीन वेळा सरकार बदलले. आलटून पालटून सर्व प्रमुख पक्ष सत्ते मध्ये होते पण कायदा निर्माण झाल्यावर त्याच्या प्रभावी अंमलबजावणी साठी जे नियम करणे अपेक्षित असते ते नियम करण्यासाठी अजून कोणत्याही सरकारला वेळ मिळाला नाही. ही अत्यंत खेदाची बाब आहे असे नमूद करून नवीन सरकार तरी हे नियम करणार का? असा सवाल महाराष्ट्र अंनिस मार्फत मुक्ता दाभोलकर आणि डॉ.हमीद दाभोलकर यांनी प्रसिद्धी पत्रकाच्या द्वारे केला आहे.

प्रसिद्धी पत्रकात पुढे असे नमूद केले आहे कि, महाराष्ट्रात गेल्या दोन महिन्यांच्यामध्ये म्हैसाळ येथील नऊ जणांचे हत्याकांड, सातारा येथील गुप्तधनाच्या लालसेमधून झालेल्या नरबळीचा छडा लागणे, पुणे येथील गुप्तधनाच्यासाठी बळी देण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांना अटक, नागपूर येथील पाच वर्षाच्या बालकाचा भुताने झपाटले आहे म्हणून नातेवाईकांनी मारहाण केल्या मधून झालेला मृत्यू, अशा अनेक मानवतेला काळिमा फासणाऱ्या अंधश्रद्धा विषयक घटना घडल्या आहेत. ह्या पार्श्वभूमीवर जादूटोणा विरोधी कायद्याची कठोर अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. त्याचा प्रमुख भाग म्हणून जादूटोणा विरोधी कायद्याचे नियम तातडीने तयार करावेत अशी अपेक्षा ह्या पत्रकात व्यक्त केली आहे.

जादूटोणा विरोधी कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणी साठी ह्या कायद्या अंतर्गत नमूद केलेल्या दक्षता अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण घेणे हे देखील अत्यंत आवश्यक आहे. प्रत्येक जिल्ह्याच्या पातळीवर जादूटोणा विरोधी कायदा प्रभावी अंमलबजावणी साठी एक नोडल पोलीस अधिकारी नेमणे आवश्यक आहे असे देखील ह्या पत्रकात नमूद केले आहे.

शासनाच्या वतीने जादूटोणा विरोधी कायदा अंमलबजावणी साठी पुरेसे प्रयत्न होत नसले तरी महाराष्ट्र अंनिस सारख्या संघटना आणि सजग नागरिकांच्या माध्यमातून महाराष्ट्रात गेल्या नऊ वर्षात एक हजार पेक्षा अधिक गुन्हे दाखल झाले आहेत, त्या मधील काही गुन्ह्याच्या मध्ये लोकांचे शोषण करणाऱ्या बाबा बुवांना शिक्षा देखील झाली आहे. ह्या मध्ये सर्व धर्मातील बाबाबुवाना शिक्षा झाल्याचे वास्तव देखील पुढे आले आहे असे महाराष्ट्र अंनिस कार्यकारी समिती सदस्य राहुल थोरात आणि फारुख गवंडी यांनी नमूद केले आहे.

प्रसिद्धी पत्रकात पुढे म्हटले आहे कि,ऑल इंडिया पिपल्स सायन्स नेटवर्क आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा स्मृती दिन २० ऑगस्ट हा राष्ट्रीय वैज्ञानिक दृष्टीकोन दिवस म्हणून दरवर्षी पाळला जातो . केरळ, आंध्र प्रदेश, तेलंगाना, दिल्ली, आसाम, पंजाब, तामिळनाडू,झारखंड, बिहार पश्चिम बंगाल ह्या राज्यांच्या मध्ये या निमित्त वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार आणि प्रसार करणारे कार्यक्रम घेतले जाणार आहेत.

महाराष्ट्राच्या जिल्ह्या जिल्ह्यातून २० ऑगस्टला अंनिस चे कार्यकर्ते सकाळी ७ वाजता निर्भय मॉर्निंग वॉक काढणे, राष्ट्रीय वैज्ञानिक दृष्टिकोन दिनानिमित्त शाळा, कॉलेज मध्ये वैज्ञानिक दृष्टिकोनावर सप्रयोग व्याख्यान देणे, डॉ. नरेद्र दाभोलकर खून तपासाबाबत मा. जिल्हाधिकारी, तहसीलदार यांना निवेदन देणे, आपल्या गावातील सार्वजनिक ठिकाणी, महापुरुषांच्या, पुतळ्याजवळ टेबल टाकून नवीन अंनिस कार्यकर्ता आणि अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र सभासद नोंदणी अभियान हे कार्यक्रम घेतले जाणार आहेत. २० ऑगस्ट हा डॉ.नरेंद्र दाभोलकर यांचा स्मृतिदिन.त्या निमित्ताने महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीतर्फे पुढील कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

वार्ता संकलन प्रदर्शन उद्घाटन: अंधश्रध्दा निर्मूलन व डॉ.नरेंद्र दाभोलकर यांच्या संबंधात गेल्या ९ वर्षात वृत्तपत्रातून प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखांचे श्रीपाल लालवाणी यांनी केलेल्या संकलनाचे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे.या प्रदर्शनाचे उद्घाटन मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ.श्रीपाल सबनिस यांच्या हस्ते शनिवार दि.२० ऑगस्ट रोजी सकाळी १०॥ वाजता होणार आहे.

डॉ.नरेंद्र दाभोलकर स्मृती व्याख्यान – महाराष्टातील संत,समाजसुधारकांची परंपरा आणि अंधश्रध्दा निर्मूलनाची चळवळ या विषयावर महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक महामंडळाचे अध्यक्ष डॉ.सदानंद मोरे यांचे व्याख्यान शनिवार दि.२०ऑगस्ट रोजी संध्याकाळी ६ वाजता होणार आहे.या वेळी सुप्रसिध्द अभिनेते सयाजी शिंदे उपस्थित राहणार आहेत. वरील दोन्ही कार्यक्रम पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन ,घोले रोड, पुणे येथे होणार आहेत.नागरिकांनी या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समिती तर्फे करण्यात येत आहे.