साप चावल्यावर काय करावे? हे उपाय करा नक्की जीव वाचेल

WhatsApp Group

सापांना शेतकऱ्यांचा मित्र म्हटले जाते. पिकांचे नुकसान करून शेतकऱ्यांना त्रासदायक ठरणाऱ्या उंदीर, घुशी इ. उपद्रवी प्राण्यांची संख्या सापांमुळे नियंत्रणात राहते. साप कधीही स्वतःहून माणसांवर हल्ला करत नाही. त्यांना स्वतःच्या जीवाला धोका वाटला तरच स्वरक्षणासाठी ते दंश करतात. इतरवेळी ते मनुष्यापासून लांबच राहतात.

साप ही निसर्गाची एक सुंदर व अत्यंत उपयोगी रचना आहे. पण आपले समज, गैरसमज व भीतीमुळे त्यांचे अस्तित्वच धोक्यात सापडले आहे.  शेतकऱ्यांचाच नव्हे, तर सर्व मानवजातीचाच मित्र असलेल्या सापांना संरक्षणाची खूप गरज आहे. पण त्यासोबतच सापापासून आपले संरक्षण व्हावे आणि सर्प दंशानंतर खबरदारी घेणेही महत्त्वाचे आहे.

सापांमध्ये विषारी, निमविषारी आणि बिनविषारी असे तीन प्रकार आढळतात. मुख्यत्वे नाग (कोब्रा), फुरसे, मण्यार, घोणस हे चार मुख्य विषारी साप आढळतात. साप  दिसला की त्याला मारायचे, हेच चित्र साधारण सर्वत्र दिसते. विषारी व बिनविषारी हा फरक समजून न घेता प्रत्येक साप विषारी आहे आणि जणू काही त्याचा जन्म माणसाचा जीव घेण्यासाठीच झाला आहे, असं समजून सापांची हत्या केली जाते.

सर्पदंश झाल्यावर दिसणारी लक्षणे 

शारीरिक इंद्रियांमधून (नाक, तोंड, कान, डोळे, गुदद्दार, शिश्न) रक्तस्त्राव होतो. तसेच किडणीचे कार्य बंद होणे, डोळ्यांना सूज येणे व पापण्या जड पडणे, डोळे फिरवणे, मूत्राचा रंग लाल किंवा गडद तपकिरी होणे, अस्वस्थ वाटणे, हातपाय जड पडणे, सांधे दुखणे, गिळण्यास त्रास होणे, पोटात दुखणे, भान नसणे, श्वास घेण्यास त्रास होणे, तोंडावाटे फेस येणे, भान नसणे ही सर्व लक्षणे दंशाच्यानंतर १० मिनिटे व ५ तासामध्ये निर्माण होतात. योग्य उपचार व वैद्यकीय सल्ल्याने ही सर्व लक्षणे कमी होऊन रुग्ण लवकर बरा होतो. मात्र ताबडतोब योग्य उपचार न मिळाल्यास रुग्णाचा मृत्यू होऊ शकतो.

सर्पदंश उपचारपद्धती

  • रूग्णास झोपू देऊ नये.
  • इतर तातडीची चिकित्सा करावी.
  • रुग्णाला २४ ते ४८ तास निरीक्षणाखाली ठेवावे.
  • योग्य सुविधा उपलब्ध नसतील तर रुग्णास प्रथमोपचार करून ताबडतोब मोठ्या रुग्णालयात न्यावे.
  • रुग्णाला हालचाल करू न देणे व त्याला धीर देऊन मनातील भीती घालविणे.
  • सर्पदंशाची जागा ही हृदयाच्या उंचीहून खाली ठेवणे तसेच दंशामुळे निर्माण झालेल्या जखमेची योग्य चिकित्सा करणे.

प्रथमोपचार महत्त्वाचे

  • सर्पदंशानंतर रुग्णाला घाबरवण्यापेक्षा शांत करण्याचा प्रयत्न करावा, कारण घाबरल्यामुळे रक्ताभिसरण वेगाने होऊन विष संपूर्ण शरीरात पसरते.
  • चाव्याच्या (दंश झालेली) जागा कोरड्या, सेल पट्टी किंवा कपड्याने झाका. ज्या केंद्रात विष प्रतिरोधक त्वरित मिळू शकेल अशा ठिकाणी त्या व्यक्तीला लगेच हलवा.
  • चाव्याजवळ कापड किंवा टूर्निर्नकट बांधू नका, यामुळे परिसंचरण बंद होईल.
  • घाव धुवू नका. घावावर बर्फ लावू नका.
  • जखमेतून विष शोषून घेण्याचा प्रयत्न करू नका.