मुंबई – नर्सरी ते पहिलीच्या वर्गामध्ये प्रवेश घेण्यासाठी बालकांचे वय नेमके किती असावे, हा काही गेल्या वर्षापासून चाललेला घोळ अखेर आता सरकारने संपवला आहे. प्राथमिक शिक्षण संचालनालयाने सुधारित परिपत्रक जारी करत पालकांना दिलासा दिला आहे. प्ले ग्रुप नर्सरी आणि पहिलीतील प्रवेश घेताना ३१ डिसेंबर २०२२ पर्यंतचे आरटीई तसेच नवीन वर्षामध्ये शाळांमध्ये प्रवेश घेतानाचे वय निश्चित करण्यात आले आहे.
शाळा प्रवेशासाठी विद्यार्थ्यांचे किमान वय निश्चित करण्यासाठी १८ सप्टेंबर २०२० च्या शासन निर्णयानुसार ३१ डिसेंबर हा मानिव दिनांक निश्चित करण्यात आला आहे.
त्यामुळे जुलै ते नोव्हेंबर महिन्यामध्ये जन्म असलेल्या बालकांच्या प्रवेशाबाबत शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये अडचणी निर्माण होत आहेत. म्हणून मानवी दिनांक बदलामुळे संबंधित विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी शैक्षणिक वर्षात सन २०२२-२३ साठी किमान वयोमर्यादा निश्चित करण्याचा निर्णय प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडून घेण्यात आला आहे.
शाळांना पूर्वप्राथमिकसाठी कमी-जास्त वयाची कारणे देऊन प्रवेश नाकारणे अपेक्षित नसते. २०२२-२३ या शैक्षणिक वर्षाच्या आरटीई प्रवेशासाठी ३१ डिसेंबर २०२२ अखेर प्रवेशासाठी निश्चित असलेले वय असावे लागणार आहे, असं प्राथमिक शिक्षण संचालनालयाचे संचालक दिनकर टेमकर यांनी सोमवारी २८ फेब्रुवारी रोजी काढलेल्या परिपत्रकामध्ये नमूद केले आहे. पूर्वप्राथमिक शिक्षणासाठी प्रवेशाच्या वयाबाबत लवचिकता आहे. किती वर्षासाठी पूर्वप्राथमिक शिक्षण घ्यायला हवे, कोणत्या वयामध्ये प्रवेश घ्यावा व कोणत्या वर्गात प्रवेश द्यावा, हे सर्वस्वी पालकांच्या इच्छेवर अवलंबून आहे, असं स्पष्ट करण्यात आले आहे.