दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या अटकेवरून ‘आप’सह विरोधी पक्षांचे अनेक नेते केंद्रावर हल्लाबोल करत आहेत. आता उद्धव सेनेचे खासदार संजय राऊत यांनीही मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. सिसोदिया यांच्यावर ज्या पद्धतीने कारवाई करण्यात आली, त्यावरून केंद्र सरकार विरोधकांचा आवाज बंद करत असल्याचे स्पष्टपणे दिसून येत असल्याचा आरोप त्यांनी केला.
ईडी आणि सीबीआयचा धाक दाखवून सरकारविरोधात प्रश्न विचारणाऱ्यांना अटक केली जात असल्याचे राऊत यांचे म्हणणे आहे. हिमालयातील सर्व संत भाजपमध्ये बसले आहेत का, असा टोला त्यांनी लगावला. लाइफ इन्शुरन्स (LIC), SBI, LIC कोणी लुटले? मनीष सिसोदिया असो की राहुल गांधी, हे सगळेच सरकारला प्रश्न विचारत आहेत. त्यामुळे त्यांच्याबाबतीत असे घडत आहे.
‘सिसोदिया यांच्या पाठीशी उभे राहू’
राऊत पुढे म्हणाले की, भाजपने कितीही दडपशाही केली. आम्ही बोलत राहू आणि आमचा पक्ष मनीष सिसोदिया यांच्या पाठीशी उभा राहील. त्याचवेळी दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना सोमवारी दुपारी 2 वाजता न्यायालयात हजर केले जाईल, असा दावा सीबीआयच्या सूत्रांनी केला आहे. त्यांना न्यायालयात हजर करण्यापूर्वी सीबीआय त्यांची वैद्यकीय चाचणीही करणार आहे.