मुंबई – पर्यावरणाचा समतोल राखून मुंबईचा सर्वांगीण विकास करण्यासाठी महाविकास आघाडी शासन प्रयत्नशील आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. त्याचबरोबर मेट्रोचे खरे श्रेय मुंबईकरांच्या कष्टाला आहे, त्यामुळे मुंबईकरांच्या हितासाठी यापुढेही कार्यरत राहणार, असेही उद्धव ठाकरे यांनी आवर्जून सांगितले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई मेट्रोच्या २- अ या दहिसर ते डहाणूकरवाडी मार्गावरील आणि मेट्रो ७ दहिसर ते आरे या दोन मार्गिकांचे उद्घाटन झाले. उदघाटनानंतर संत पायस महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित कार्यक्रम झाला. त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलत होते.
यावेळी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, उद्योग मंत्री सुभाष देसाई, परिवहन मंत्री ॲड. अनिल परब, पर्यटन मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे, वस्त्रोद्योगमंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री अस्लम शेख, खासदार गजानन किर्तीकर, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, एमएमआरडीएचे आयुक्त एस. व्ही. आर. श्रीनिवासन आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, मुंबईचा विकास सातत्याने होत आहे. लोकसंख्येत वाढ होत आहे. मात्र सुविधा वाढवायच्या कशा हे आव्हान आहे. मात्र महाविकास आघाडी सरकारचा सामान्य मुंबईकरांना सुविधा देण्याचा निश्चय आहे. कारण मुंबईच्या विकासात खरे योगदान सामान्य मुंबईकरांच्या कष्टाचे आहे. मेट्रो प्रकल्पाच्या पूर्ततेसाठीही अनेक मुंबईकरांनी योगदान दिले आहे. त्यामुळे मेट्रोचे खरे श्रेय मुंबईकरांना आहे.
मुंबईत अनेक विकासप्रकल्प सुरू करण्यात आले आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने पायाभूत सुविधा विकसित करण्यावर भर दिला आहे. मुंबई करांना आनंदाने जगता यावे, असे विकासप्रकल्प प्राधान्याने राबवत आहोत. त्यामध्ये मुंबई ट्रान्स हार्बर लिंक, कोस्टल रोड, न्हावा शेवा ते शिवडी अशा अनेक प्रकल्पांचा समावेश आहे. या प्रकल्पामुळे मुंबईकरांना आनंदाने आणि जलद गतीने प्रवास करता येईल, असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.