
मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घरासमोर हनुमान चालीसा पठण करण्याचं आव्हान करत, सामाजिक तेढ निर्माण करणारं विधान केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या राणा दाम्पत्याला वांद्रे न्यायालयाकडून 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
दरम्यान, खासदार नवनीत राणा यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहून तुरुंगामध्ये मिळालेल्या वागणुकीबद्दल गंभीर आरोप केले आहेत. नवनीत राणा यांनी बिर्ला यांना लिहीलेल्या पत्रामध्ये अनेक धक्कादायक आरोप केले आहेत. मी संपूर्ण रात्र पोलीस स्टेशनमध्ये काढली. मी पिण्यासाठी पाणी मागितले, पण मला रात्रभर पाणीही दिलं नाही. पाणी मागितल्यामुळे आम्हाला जातीवाचक शिवीगाळ करण्यात आली. मी अनुसूचित जातीची आहे, यामुळे मला पाणी पिण्यासारखा मूलभूत हक्कही नाकारण्यात आला.
त्यांनी पत्रात असंही म्हटलं आहे की, “मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनाही हनुमान चालीसा पठण करण्यासाठी आम्ही आमंत्रित केले होते. माझा हा उपक्रम मुख्यमंत्र्यांच्या विरोधामध्ये नव्हता. पण, मुंबईमधील कायदा आणि सुव्यवस्थेचा विचार करुन आम्ही हनुमान चालीसा पठण करण्याचा निर्णय मागे घेतला आणि मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी जाणार नसल्याचं सांगितलं. पण, त्यानंतर मला आणि माझ्या पतीला घरात कैद केले.
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने सार्वजनिक जनादेशाचा अपमान करून काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत युती केली आहे. यावरुन ते हिंदुत्वापासून पूर्णपणे विचलित झाल्याचं दिसत आहे. शिवसेनेमध्ये हिंदुत्वाची ज्योत पुन्हा प्रज्वलित करण्याच्या आशेने आम्ही मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी जाऊन हनुमान चालीसा पठण करण्याची घोषणा केली होती. कोणत्याही प्रकारचा धार्मिक तणाव निर्माण करण्याचा आमचा हेतू नव्हता,” असंही राणा यांनी पत्रात म्हटले आहे.