Lifestyle: ‘अश्लील व्हिडिओ’ पाहणं ठरू शकतं तुमच्या नात्यांमध्ये दुरावा आणणारं कारण

WhatsApp Group

तुम्ही किंवा तुमचा जोडीदार सतत अश्लील व्हिडिओ पाहत असाल, तर हा सवयीचा प्रश्न नसून नात्यांमध्ये निर्माण होणाऱ्या दुराव्याचं सुरुवातीचं लक्षण असू शकतं. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, पोर्नोग्राफीकडे वारंवार वळणं ही एक लत ठरते, जी शारीरिक आणि मानसिक आरोग्याबरोबरच नातेसंबंधांवरही खोल परिणाम करते.

अश्लीलतेकडून अवास्तव अपेक्षांकडे

अश्लील व्हिडिओंमध्ये दाखवले जाणारे प्रसंग वास्तव जीवनापेक्षा खूप वेगळे असतात. यामुळे पाहणाऱ्या व्यक्तीच्या मनात लैंगिक संबंधांबाबत चुकीच्या अपेक्षा निर्माण होतात. हेच अपेक्षा जेव्हा आपल्या जोडीदाराकडून पूर्ण होत नाहीत, तेव्हा तणाव, असमाधान आणि नकारात्मक भावना वाढतात.

जोडीदाराकडे दुर्लक्ष

बराच वेळ मोबाइल, लॅपटॉपवर अश्लील कंटेंट पाहण्यात घालवणाऱ्या व्यक्तींचं आपल्या जोडीदाराशी संवाद कमी होतो. त्यांचं लक्ष, भावना आणि शारीरिक आकर्षणही नकळत त्या व्हिडिओंमध्ये गुंतलेलं राहतं. त्यामुळे वैवाहिक किंवा प्रेमसंबंधांमध्ये ओढ कमी होऊन तुटकपणा येतो.

आत्मविश्वास आणि शरीराच्या प्रतिमेवर परिणाम

ज्यांच्या जोडीदाराला अश्लील कंटेंट पाहण्याची सवय असते, त्या व्यक्तींमध्ये कमीपणाची भावना निर्माण होते. ‘मी पुरेशी/पुरेसा नाही’ हा विचार मनात घर करतो आणि त्यामुळे आत्मविश्वास डळमळीत होतो. हे अनेकदा मानसिक आरोग्याचं संकट निर्माण करतं.

विश्वासाचा तुटलेला धागा

अश्लील व्हिडिओ पाहणं अनेकदा लपवून केलं जातं. जेव्हा हे उघड होतं, तेव्हा दुसऱ्या जोडीदाराला फसवले गेल्याची भावना येते. यामुळे नात्यातील विश्वास तुटतो आणि पुन्हा ती जवळीक साधणं कठीण होतं.

काय करायला हवं?

  • जोडीदाराशी खुला आणि प्रामाणिक संवाद साधा

  • संबंधांमध्ये वैविध्य आणण्यासाठी दोघांनीही प्रयत्न करा

  • अश्लील व्हिडिओ पाहण्याची लत असल्यास मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घ्या

  • एकत्र वेळ घालवण्याच्या सवयी वाढवा

  • आपल्या जोडीदाराची गरज, भावना समजून घेण्याचा प्रयत्न करा

अश्लील व्हिडिओ पाहणं सुरुवातीला सामान्य वाटू शकतं, पण ते एक वळण घेऊन नात्यात मोठा दुरावा निर्माण करू शकतं. त्यामुळे वेळेत संवाद, समज आणि सायकोलॉजिकल मदतीद्वारे या समस्येवर मात करणं गरजेचं आहे.