कोकणातील सर्व जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा

WhatsApp Group

मुंबई : हवामान खात्याकडून राज्यात पुढील ३ दिवस म्हणजे दिनांक ११ जुलै, २०२२ पर्यंत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. विशेषतः कोकण विभागातील सर्व जिल्ह्यांना मुसळधार ते अति मुसळधार (६४ ते २०० मिमी) पावसाचा इशारा देण्यात आले आहे.

कोकण विभागात पालघर जिल्ह्यात गेल्या २४ तासात सरासरी ६६ मिमी. पाऊस झाला असून सद्यस्थिती मध्ये जिल्ह्यातील परिस्थिती सामान्य असून जिल्ह्यातील तीन मुख्य नद्या इशारा पातळीपेक्षा खाली  वाहत आहेत. जिल्ह्यात कोठेही पूरपरिस्थिती नसून खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यात एनडीआरएफ चे एक पथक तैनात करण्यात आली आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या २४ तासात १२७.० मिमी एवढ्या पावसाची नोंद झाली असून कुठेही पूर परिस्थिती नाही तसेच सर्व नद्या इशारा पातळीच्या खाली वाहत आहेत. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक सुरुळीत सुरु आहे. खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यात एक एनडीआरएफ ची टीम तैनात करण्यात आली आहेत,

ठाणे जिल्ह्यात गेल्या २४ तासात सरासरी ७६.४ मिमी. पाऊस झाला आहे. जिल्ह्यात कुठेही पूर परिस्थिती नाही तसेच सर्व नद्या इशारा पातळीच्या खाली वाहत आहेत. जिल्ह्यात सर्व प्रकारची वाहतूक सुरुळीत सुरु आहे. खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यात एनडीआरएफ च्या दोन टीम तैनात करण्यात आल्या आहेत.

मुंबई गेल्या २४ तासात कुलाबा येथे ५२.८ मिमी तर सांताक्रूझ येथे ४९.८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. मात्र अद्याप सर्व प्रकारची वाहतूक सुरळीत असल्याबाबत बीएमसी नियंत्रण कक्षाने कळविले आहे. मध्य रेल्वे व पश्चिम रेल्वे मार्गावरील वाहतूक सुरळीत सुरु आहे. मुंबई मध्ये एनडीआरएफ च्या एकूण ५ टीम तैनात करण्यात आल्या आहेत.

राज्यात अनेक ठिकाणी मध्यम ते मुसळधार पाऊस सुरु असून मंत्रालय नियंत्रण कक्ष राज्यातील सर्व जिल्हा नियंत्रण कक्षांच्या सातत्याने संपर्कात आहे. पूर परिस्थितीबाबत उपाययोजना म्हणून प्रशासनातर्फे एनडीआरएफ व एसडीआरएफ च्या तुकड्या पूर प्रवण जिल्ह्यांमध्ये या आधीच तैनात केल्या आहेत.