Weather Update: कडाक्याच्या उन्हानंतर आता पावसाचं संकट! देशभरातील अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाचा इशारा

सध्या देशातील बहुतांश भागांमध्ये तीव्र उष्णतेचं प्रमाण वाढलेलं असतानाच, हवामान खात्याने आता मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. एकीकडे तापमानाने चाळिशी पार केली असताना, दुसरीकडे पुन्हा वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
भारतीय हवामान विभागानं (IMD) दिलेल्या ताज्या अंदाजानुसार, पुढील काही दिवस देशातील अनेक भागांमध्ये अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. विशेषतः पूर्व राजस्थान, मध्यप्रदेश (पश्चिम व पूर्व), महाराष्ट्र, छत्तीसगड, झारखंड, ओडिशा, बिहार आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये वादळी वाऱ्यांसह जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
या काळात वाऱ्याचा वेग प्रति तास ५० ते ६० किमी पर्यंत असू शकतो, असं IMD ने स्पष्ट केलं आहे. तसेच हिमाचल प्रदेश, सिक्कीम आणि पश्चिम बंगालच्या काही भागांमध्येही जोरदार पावसाची शक्यता आहे. या भागांमध्ये वाऱ्याचा वेग ४० ते ५० किमी प्रति तासापर्यंत जाऊ शकतो.
महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा – या जिल्ह्यांना सर्वाधिक धोका
महाराष्ट्रातील विदर्भातही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. भंडारा, नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याठिकाणीही ४० ते ५० किमी प्रति तास वेगाने वारे वाहण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
शेतकऱ्यांना फटका बसण्याची शक्यता
दरम्यान, या अनपेक्षित हवामान बदलामुळे शेतकऱ्यांच्या संकटात भर पडण्याची शक्यता आहे. अचानक होणाऱ्या वादळ व पावसामुळे उभ्या पिकांचे नुकसान होण्याचा धोका वाढला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी हवामानाच्या अपडेट्सवर लक्ष ठेवून योग्य ती खबरदारी घ्यावी, असा सल्ला कृषी विभागाने दिला आहे.