विराटने आजच्याच दिवशी लॉर्ड्सवर रचला होता इतिहास, अशी कामगिरी करणारा ठरला होता तिसरा भारतीय कर्णधार

WhatsApp Group

Virat Kohli : भारतीय संघाच्या सर्वोत्तम कर्णधारांच्या यादीत विराट कोहलीचा समावेश आहे. आपल्या कार्यकाळात त्याने टीम इंडियाला अनेक महत्त्वाच्या सामन्यांमध्ये विजय मिळवून दिला. कोहलीच्या नावावर एक खास विक्रम नोंदवला गेला आहे. लॉर्ड्सवर इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात संघाला विजय मिळवून देणारा तो भारताचा तिसरा कर्णधार आहे. या दिवशी भारताने इंग्लंडचा (16 ऑगस्ट 2021) पराभव केला होता. कोहलीच्या आधी दोनच कर्णधारांना ही कामगिरी करता आली. महेंद्रसिंग धोनी आणि कपिल देव यांनी लॉर्ड्स कसोटीत भारताला विजय मिळवून दिला होता.

टीम इंडिया 2021 मध्ये इंग्लंड दौऱ्यावर होती. यादरम्यान लॉर्ड्सवर कसोटी मालिकेतील दुसरा सामना खेळला गेला. यामध्ये भारताने पहिल्या डावात सर्वबाद 364 धावा केल्या होत्या. तर दुसरा डाव 298 धावांवर घोषित करण्यात आला. केएल राहुलने पहिल्या डावात शतक झळकावले. त्याने 129 धावांची खेळी खेळली. तर अजिंक्य रहाणे आणि मोहम्मद शमीने दुसऱ्या डावात अर्धशतके झळकावली.

प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ पहिल्या डावात 391 धावा करत सर्वबाद झाला. कर्णधार जो रूटने संघासाठी 180 धावांची उत्कृष्ट खेळी खेळली. भारताकडून इशांत शर्माने 3 आणि मोहम्मद सिराजने 4 विकेट्स घेतल्या. दुसऱ्या डावात 120 धावा करून इंग्लंडचा संघ सर्वबाद झाला. सिराजने दुसऱ्या डावातही 4 बळी घेतले. अशा प्रकारे भारताने ही कसोटी 151 धावांनी जिंकली.

लॉर्ड्सवर कसोटी सामना जिंकून कोहलीने इतिहास रचला. त्याच्या आधी भारताचे दोनच कर्णधार येथे कसोटी सामना जिंकू शकले आहेत. कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने 5 विकेट्सने विजय मिळवला. तर धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने 95 धावांनी विजय मिळवला.