
Virat Kohli : भारतीय संघाचा दिग्गज फलंदाज विराट कोहली दीर्घ काळानंतर ‘विराट’ फॉर्ममध्ये परतला आहे. त्याने आशिया कपमध्ये अफगाणिस्तानविरुद्ध 61 चेंडूत 122 धावांची धडाकेबाज खेळी खेळली होती. त्याचबरोबर आशिया कपमध्ये 276 धावा केल्या होत्या. इतक्या जबरदस्त फॉर्ममध्ये परतल्यानंतरही कोहलीच्या निवृत्तीची चर्चा आहे. याआधी पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने विराटला करिअरमध्ये चांगल्या स्थितीत राहून निवृत्ती घेण्याचा सल्ला दिला होता. त्याचवेळी आफ्रिदीनंतर पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने विराट कोहलीच्या निवृत्तीची तारीख सांगितली आहे.
पाकिस्तानच्या या माजी दिग्गज वेगवान गोलंदाजाने विराटच्या निवृत्तीबद्दल सांगितले की, भारताचा माजी कर्णधार विराट कोहली ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-20 विश्वचषक 2022 नंतर टी-20 फॉर्मेटमधून निवृत्ती घेईल. क्रिकेटच्या इतर फॉरमॅटमध्ये दीर्घकाळ टिकून राहण्यासाठी विराट हा निर्णय घेऊ शकतो. शोएब म्हणाला की, विराटच्या जागी मी असतो तर भविष्याचा विचार करून हाच निर्णय घेतला असता.
टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा विराट कोहली दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याच्या पुढे फक्त रोहित शर्मा आहे. आपल्या टी टी-20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत, विराटने 104 सामन्यांमध्ये 3584 धावा केल्या आहेत. या दरम्यान त्याचा स्ट्राइक रेट 138.37 राहिला आहे. कोहलीने टी-20 मध्ये 32 अर्धशतके आणि एक शतक झळकावले आहे.
विराट कोहली बराच काळ फॉर्ममध्ये नसला तरी त्याने आशिया कपमध्ये जोरदार पुनरागमन केले. आशिया चषक स्पर्धेच्या सुरुवातीच्या सामन्यांमध्ये त्याने लहान खेळी खेळल्या आणि स्पर्धेतील शेवटच्या सामन्यात अफगाणिस्तानविरुद्ध केवळ 53 चेंडूत शतक झळकावले. 1020 दिवसांनंतर विराटच्या बॅटमधून शतक झळकले.