Virat Kohli 100th T20 Match: विराटच्या कारकिर्दीतील सर्वात मोठा सामना, पाकविरुद्ध मैदानात उतरताच रचला इतिहास

Virat Kohli 100th T20 Match: भारतीय क्रिकेट संघ रविवारी (28 ऑगस्ट) आशिया कप 2022 मध्ये पदार्पण करेल. टीम इंडियाला पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध दुबईत खेळायचा आहे. भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीच्या कारकिर्दीतील हा मोठा सामना असेल. या सामन्यात मैदानात उतरताच कोहली इतिहास रचणार आहे. कोहली बर्याच काळापासून वाईट परिस्थितीतून जात आहे. पण तरीही कोहली काही ना काही विक्रम करण्याच्या तयारीत आहे. यावेळीही असेच काहीसे होणार आहे.
यावेळी आशिया कप टी-२० फॉरमॅटमध्ये खेळवला जात आहे. अशा परिस्थितीत कोहली जर पाकिस्तानविरुद्ध सामना खेळला तर त्याच्या कारकिर्दीतील हा 100 वा टी-20 आंतरराष्ट्रीय सामना असेल. अशाप्रकारे 100 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा कोहली भारताचा दुसरा खेळाडू ठरणार आहे.या बाबतीत रोहित शर्मा त्याच्या पुढे आहे. भारतीय कर्णधार रोहित हा जगातील सर्वाधिक 132 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा खेळाडू आहे. कोहलीनंतर रोहितकडे टीम इंडियाचे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे.
यासोबतच विराट कोहली आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये (कसोटी, एकदिवसीय, टी-20) 100-100 सामने खेळणारा आशियातील पहिला आणि जगातील दुसरा क्रिकेटपटू बनेल. कोहलीने 262 एकदिवसीय आणि 102 कसोटी सामन्यांशिवाय आतापर्यंत 99 टी-20 सामने खेळले आहेत.
कोहली आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये (कसोटी, एकदिवसीय, टी-20) 100-100 सामने खेळणारा जगातील दुसरा खेळाडू बनेल. सध्या हा विक्रम न्यूझीलंडचा दिग्गज खेळाडू रॉस टेलरच्या नावावर आहे. टेलरने 112 कसोटी, 236 एकदिवसीय आणि 102 टी-20 सामने खेळले.