
विराट कोहलीने आता T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घ्यावी, अशी पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरची इच्छा आहे. क्रिकेटच्या या सर्वात लहान फॉरमॅटऐवजी विराटने ही अतुलनीय ऊर्जा इतर फॉरमॅटमध्ये घालायला हवी, असे त्याचे मत आहे.
शोएब त्याच्या यूट्यूब चॅनलवर म्हणाला, ‘मला वाटते की विराटने पाकिस्तानविरुद्ध त्याच्या कारकिर्दीतील सर्वात मोठी खेळी खेळली. तो असे खेळू शकला कारण त्याला स्वतःवर विश्वास होता की तो हे करू शकतो. तो दणक्यात परतला आहे. त्याने आता T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घ्यावी अशी माझी इच्छा आहे. त्याने आपली सर्व शक्ती T20 क्रिकेटमध्ये लावावी असे मला वाटत नाही. पाकिस्तानविरुद्ध त्याने ज्या प्रकारची बांधिलकी दाखवली आहे, त्यामुळे तो एकदिवसीय क्रिकेटमध्ये चमत्कार घडवू शकतो.
रविवारी खेळल्या गेलेल्या T20 विश्वचषक 2022 मध्ये विराट कोहलीने पाकिस्तानविरुद्ध 53 चेंडूत 82 धावा केल्या. त्याच्या खेळीमुळे भारतीय संघाला अशक्य वाटणारा विजय शक्य करून दाखवता आला. शोएब अख्तरने त्याच्या या खेळीचे कौतुक केले आहे.
अख्तर म्हणाला, ‘गेल्या तीन वर्षांपासून तो लयीत नव्हता. त्याला धावाही करता आल्या नाहीत. त्याच्याकडून कर्णधारपद काढून घेण्यात आले. अनेकांनी त्याच्याबद्दल खूप काही सांगितले. त्याच्या कुटुंबालाही लोकांनी त्यात ओढले. पण त्याने आपल्या सरावात सातत्य राखले आणि दिवाळीच्या एक दिवस अगोदर एक शानदार खेळी खेळली. त्याने ठरवले की ही जागा आणि हा टप्पा त्याच्या परतीसाठी योग्य आहे. अख्तर म्हणाले, ‘राजा परत आला आहे आणि तो दणक्यात परतला आहे.