IND vs AUS: किंग कोहलीने मोडला क्रिकेटच्या देवाचा ‘हा’ विक्रम

WhatsApp Group

भारतीय संघाचा दिग्गज फलंदाज विराट कोहलीने दिल्ली कसोटीत एक विशेष कामगिरी केली. विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 25 हजार धावा पूर्ण केल्या. ही कामगिरी करणारा तो भारतातील दुसरा आणि जगातील सहावा फलंदाज ठरला आहे. त्याने सचिन तेंडुलकरचा एक विक्रम मोडीत काढला आहे. दिल्ली कसोटीच्या दुसऱ्या डावात सात धावा करताच कोहलीने ही कामगिरी केली. कोहली सर्वात जलद 25 हजार पूर्ण करणारा फलंदाज ठरला आहे. विराट कोहलीने 549 व्या डावात ही कामगिरी केली.

विराट कोहलीने या कामगिरीसह सचिनचा विक्रम मोडला असून, तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 25 हजार धावा करणारा खेळाडू बनला आहे. यापूर्वी हा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर होता, त्याने 577 डावांमध्ये हा विक्रम केला होता.

 

सर्वाधिक आंतरराष्ट्रीय धावा

सचिन तेंडुलकर – 782 डाव – 34357 धावा
कुमार संगकारा – 666 डाव – 28016 धावा
रिकी पाँटिंग – 668 डाव – 27483 धावा
महेला जयवर्धने – 725 डाव – 25957 धावा
जॅक कॅलिस – 617 डाव – 25534 धावा
विराट कोहली – 549 डाव – 25012 धावा

सर्वात वेगवान 25,000 धावा करणारे फलंदाज

विराट कोहली – 549 डाव
सचिन तेंडुलकर – 577 डाव
रिकी पाँटिंग – 588 डाव

विराट कोहलीने दिल्ली कसोटीच्या दुसऱ्या डावात 20 धावा केल्या आणि त्याला टॉड मर्फीने यष्टीचीत केले. पहिल्या कसोटीतही कोहलीला टॉड मर्फीने बाद केले. दिल्ली कसोटीच्या पहिल्या डावात कोहलीने 44 धावांची खेळी केली होती. विराट कोहलीने भारतासाठी 106 कसोटी, 271 एकदिवसीय आणि 115 टी-20 सामने खेळले आहेत. विराट कोहलीच्या नावावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 74 शतके आणि 129 अर्धशतके आहेत. सचिन तेंडुलकर (100 शतके) नंतर सर्वाधिक शतके झळकावणारा तो दुसरा फलंदाज आहे. विराट कोहलीने 53.65 च्या सरासरीने 25 हजार धावा केल्या आहेत.