
Virat Kohli Record: भारतीय संघाचा स्टार फलंदाज आणि माजी कर्णधार विराट कोहली दररोज काही ना काही विक्रम करत असतो. आशिया कप 2022 मधून फॉर्ममध्ये परतलेला विराट कोहली सातत्याने शानदार खेळी करत आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या दुसऱ्या T20 सामन्यात विराट कोहलीने 28 चेंडूत 49 धावांची नाबाद खेळी खेळली. यासह एक मोठा विक्रम त्याच्या नावावर झाला.
गुवाहाटी T20 मध्ये कोहलीने 7 चौकार आणि एक शानदार षटकार मारला. या खेळीसह विराट कोहली T20 क्रिकेटमध्ये 11,000 धावा करणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. हा पराक्रम करणारा कोहली जगातील चौथा खेळाडू आहे. T20 क्रिकेटमध्ये 11,000 धावा करणारा विराट कोहली हा पहिला भारतीय आणि जगातील चौथा खेळाडू ठरला आहे. विराट कोहलीपूर्वी ख्रिस गेल, किरन पोलार्ड आणि शोएब मलिक यांनी T20 क्रिकेटमध्ये हा आकडा पार केला आहे. T20 क्रिकेटमध्ये ख्रिस गेलच्या 14562, किरन पोलार्डच्या 11914 आणि पाकिस्तानच्या शोएब मलिकच्या 11902 धावा आहेत.
Virat Kohli becomes the first Indian to get to 1⃣1⃣0⃣0⃣0⃣ T20 runs 👏👏#TeamIndia pic.twitter.com/2LZnSkYrst
— BCCI (@BCCI) October 2, 2022
नाणेफेक हरल्यानंतर फलंदाजीचा निर्णय घेत भारतीय संघाने 20 षटकांत 3 गडी गमावून 237 धावा केल्या. प्रथम फलंदाजीला आलेल्या भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली. भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि केएल राहुल यांनी पहिल्या विकेटसाठी 9.5 षटकांत 96 धावा जोडल्या. रोहित शर्माने 37 चेंडूत 43 धावा केल्या, तर केएल राहुलने 28 चेंडूत 57 धावांचे योगदान दिले.हे दोघे बाद झाल्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव यांनी तुफानी फलंदाजी केली. सूर्यकुमार यादवने 22 चेंडूत 61 धावांची शानदार खेळी केली. या खेळीत त्याने 5 षटकार आणि 5 चौकार मारले. याशिवाय विराट कोहलीने 28 चेंडूत नाबाद 49 धावा केल्या. या फलंदाजांच्या शानदार फलंदाजीमुळे भारताला 237 धावांची मोठी धावसंख्या उभारता आली. मात्र, दक्षिण आफ्रिकेच्या संघाला हे लक्ष्य गाठता आले नाही आणि 221 धावा करून 16 धावांनी सामना गमावला.