भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने वनडे क्रिकेट कारकिर्दीतील 46 वे शतक ठोकले आहे. तिरुवनंतपुरम येथील ग्रीनफिल्ड इंटरनॅशनल स्टेडियमवर रविवारी श्रीलंकेविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात कोहलीने आणखी एक शतक झळकावले. या मालिकेतील त्याचे हे दुसरे शतक आहे. पहिल्या वनडेतही त्याने शतक झळकावले. तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात 43व्या षटकात करुणारत्नेच्या शेवटच्या चेंडूवर विराटने आपले 46वे शतक पूर्ण केले. श्रीलंकेविरुद्धचे हे त्याचे 10 वे वनडे शतक आहे. त्याने 85 चेंडूत 10 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने आपले शतक पूर्ण केले. कोहलीने 110 चेंडूत 13 चौकार आणि 8 षटकारांच्या मदतीने 166 धावांची नाबाद शतकी खेळी केली. तिरुअनंतपुरम येथील ग्रीनफिल्ड आंतरराष्ट्रीय मैदानावर कोणत्याही फॉर्मेटमध्ये कोणत्याही फलंदाजाने केलेली ही सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या आहे.
किंग कोहलीपूर्वी सलामीवीर शुभमन गिलनेही याच सामन्यात 116 धावांची शतकी खेळी केली होती. कोहली आणि शुभमनच्या शतकांमुळे भारताने पूर्ण 50 षटके खेळून 5 गड्यांच्या मोबदल्यात 390 धावा केल्या आहेत.
Take a bow, Virat Kohli 🫡
Live – https://t.co/muZgJH3f0i #INDvSL @mastercardindia pic.twitter.com/7hEpC4xh7W
— BCCI (@BCCI) January 15, 2023
गेल्या 4 एकदिवसीय डावात त्याने 3 शतके झळकावली आहेत. या शतकासह विराटने घरच्या मैदानावर सचिन तेंडुलकरचा आणखी एक मोठा विक्रम मोडला आहे. मायदेशात वनडेत सर्वाधिक शतके ठोकण्याच्या बाबतीत विराट आता सचिनच्याही पुढे गेला आहे. विराटपूर्वी सचिनने घरच्या मैदानावर एकदिवसीय क्रिकेटमध्ये 20 शतके झळकावली होती, परंतु आता रन मशीन कोहली घरच्या मैदानावर 21 वनडे शतके झळकावून ‘क्रिकेटचा देव’ ठरला आहे. या यादीत दक्षिण आफ्रिकेचा माजी सलामीवीर हाशिम आमला 14 शतकांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.
15 जानेवारी रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील विराटचे हे चौथे शतक आहे. यापूर्वी त्याने 15 जानेवारीला इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध शतके झळकावली होती.
15 जानेवारीला विराटचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक
2017 मध्ये इंग्लंडविरुद्ध 122 धावा
2018 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 153 धावा
2019 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध 104 धावा
2023 मध्ये श्रीलंकेविरुद्ध नाबाद 166 धावा.
वनडेमध्ये सर्वाधिक धावा करणारा विराट ठरला पाचवा फलंदाज
विराटचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील हे 74 वे शतक आहे. यासह तो वनडे इतिहासात सर्वाधिक धावा करणारा पाचवा फलंदाज ठरला आहे. त्याने 259 डावात 12600 हून अधिक धावा केल्या आहेत. यासोबतच किंग कोहलीने द्विपक्षीय क्रिकेट मालिकेत 20 हजार धावाही पूर्ण केल्या आहेत.
वनडे इतिहासात सर्वाधिक धावा करणारे टॉप-5 फलंदाज
सचिन तेंडुलकर – 18426 धावा
कुमार संगकारा – 14234 धावा
रिकी पाँटिंग – 13704 धावा
सनथ जयसूर्या –13430 धावा
विराट कोहली – 12651