लाईक्सच्या नादात माणुसकी विसरला! रील बनवण्यासाठी मगरींच्या अंगावर टाकला बॉम्ब; तरुणाचा संतापजनक प्रकार

WhatsApp Group

कोटा (राजस्थान): सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी लोक कोणत्या थराला जातील याचा नेम नाही. राजस्थानमधील कोटा येथून एक अत्यंत संतापजनक प्रकार समोर आला आहे. एका तरुणाने केवळ इंस्टाग्राम रीलवर ‘लाईक्स’ आणि ‘व्ह्यूज’ मिळवण्यासाठी नदीकिनारी शांत बसलेल्या मगरींच्या घोळक्यात पेटता सुतली बॉम्ब फेकला. या भयंकर कृत्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सर्वत्र संतापाची लाट उसळली असून वन विभागाने या प्रकरणी कठोर पावले उचलली आहेत.

नेमकी घटना काय?

कोटा येथील चंद्रलोही नदीच्या काठी अनेक मगरी उन्हात बसल्या होत्या. त्याच वेळी एका माथेफिरू तरुणाने आपली रील रोमांचक बनवण्यासाठी एक मोठा सुतली बॉम्ब पेटवला आणि तो थेट मगरींच्या अंगावर फेकला. भीषण स्फोट होताच तिथे मोठी खळबळ उडाली. घाबरलेल्या मगरींनी जिवाच्या आकांताने नदीत उड्या मारल्या, तर आसपासचे पक्षीही दहशतीमुळे उडून गेले. हा सर्व प्रकार या तरुणाने कॅमेऱ्यात कैद केला आणि रविवारी सोशल मीडियावर अपलोड केला.

येथे आहे व्हिडिओची लिंक

२१ हजार व्ह्यूज मिळाले, पण पोलिसांची कारवाई सुरू झाली

व्हिडिओ अपलोड केल्यानंतर अवघ्या काही तासांतच त्याला २१ हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले. मात्र, नेटिझन्सनी या कृत्यावर जोरदार टीका करण्यास सुरुवात केली. अनेकांनी “पुढची रील आता वन विभागाच्या कोठडीतून येईल,” अशा शब्दांत आरोपीचा समाचार घेतला. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून वन विभागाने बोरखेडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

आरोपीने व्हिडिओ केला डिलीट

पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याची बातमी समजताच घाबरलेल्या तरुणाने आपल्या अकाउंटवरून तो व्हिडिओ तातडीने डिलीट केला. मात्र, तोपर्यंत व्हिडिओचे पुरावे पोलिसांच्या हाती लागले होते. एएसआय करतार यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीची ओळख पटवण्याचे काम सुरू असून त्याला लवकरच अटक करण्यात येईल.