Viral Video: रील बनवताना ‘दीदी’ला बसला 70 हजारांचा फटका! स्टेडियममध्ये अंगठी हवेत उडवणं पडलं महाग; पाहा व्हायरल व्हिडिओ
सध्याच्या काळात रील बनवण्याचे वेड तरुणाईच्या इतकं अंगात भिनलं आहे की, त्यासाठी ते कोणत्याही थराला जायला तयार असतात. मात्र, कधीकधी हा छंद खिशाला चांगलाच कात्री लावतो. असाच एक धक्कादायक आणि मजेशीर प्रकार पंजाबच्या महाराजा यादवेंद्र सिंह पीसीए स्टेडियममध्ये (Mullanpur Stadium) घडला आहे. एका महिला चाहत्याला आयपीएल सामन्यादरम्यान रील बनवण्याचा मोह आवरला नाही आणि त्यात तिने तिची ७० हजार रुपयांची अंगूठी गमावली आहे.
कॅमेरा अँगलच्या नादात अंगठी ‘आऊट’
आयपीएल २०२६ मधील सनरायझर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्स यांच्यातील चुरशीचा सामना पाहण्यासाठी ही महिला स्टेडियममध्ये आली होती. स्टँड्समध्ये बसलेली असताना तिने एक ट्रेंड फॉलो करण्याचे ठरवले. व्हिडिओमध्ये दिसते की, ती आपली महागडी अंगठी हवेत उडवून रील शूट करण्याचा प्रयत्न करते. मात्र, नेमका कॅमेरा अँगल सेट करण्याच्या नादात तिचे अंगठीवरून लक्ष विचलित झाले. अंगठी हाताऐवजी थेट पायऱ्यांवरून खाली पडली आणि पाहता पाहता गायब झाली.
इंस्टाग्रामवर मदतीसाठी साद; पण नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
मधुप्रिया नावाच्या या इंस्टाग्राम यूजरने हा व्हिडिओ शेअर करत आपली व्यथा मांडली आहे. “अंगठी अजूनही सापडलेली नाही. जर स्टेडियममधील स्टाफला ती सापडली, तर कृपया मला मेसेज करा,” अशी विनंती तिने केली आहे. मात्र, तिची ही विनंती ऐकून घेण्याऐवजी नेटकऱ्यांनी तिची चांगलीच शाळा घेतली आहे. काहींनी हा प्रकार केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी केलेला ‘स्टंट’ असल्याचे म्हटले आहे, तर काहींनी तिच्या या अविचारावर कडक शब्दांत टीका केली आहे.
“डोकं घरी विसरलात का?” – नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्स
हा व्हिडिओ व्हायरल होताच कमेंट्सचा पाऊस पडला आहे. एका युजरने उपरोधिकपणे विचारले, “एवढाच छंद होता तर ७० हजारांची कशाला, साधी नकली अंगठी उडवायची ना!” दुसऱ्या युजरने लिहिले की, “७० हजारांची अंगठी हरवूनही बाईंच्या चेहऱ्यावर साधी चिंतेची लकीर नाही, हे आश्चर्यच आहे.” तर एकाने “पुढच्या वेळी रील बनवताना डोकं घरी विसरून येऊ नका,” असा खोचक सल्लाही दिला आहे. अनेकांनी याला ‘मोय-मोय’ मोमेंट म्हटले असून हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान शेअर केला जात आहे.
