Viral Video: “आई, ही बाहुली आहे का?” हॉस्पिटलमध्ये भावा-बहिणीची पहिली भेट! व्हिडिओ पाहून तुमच्याही डोळ्यांत येईल पाणी
नातेसंबंधांमधील ओलावा आणि भावंडांमधील पहिले प्रेम व्यक्त करणारा एक हृदयस्पर्शी व्हिडिओ सध्या इंटरनेटवर प्रचंड व्हायरल होत आहे. आपल्या नवजात लहान बहिणीला भेटण्यासाठी हॉस्पिटलमध्ये पोहोचलेल्या एका चिमुकल्याची प्रतिक्रिया पाहून नेटकऱ्यांचे डोळे पाणावले आहेत. या व्हिडिओमध्ये केवळ भावंडांचे प्रेमच नाही, तर एका आईने बाळाला जन्म देण्यासाठी सोसलेल्या कष्टांचेही दर्शन घडते.
“आई, ही खरी आहे की बाहुली?” चिमुकल्याची निरागसता
‘बनिया २ बंगाली’ या इन्स्टाग्राम हँडलवरून शेअर करण्यात आलेल्या या व्हिडिओची सुरुवात एका सुंदर दृश्याने होते. एक छोटा मुलगा हॉस्पिटलच्या खोलीत प्रवेश करतो. तिथे आपली आई आणि शेजारी झोपलेल्या चिमुकल्या जिवाला पाहून तो थक्क होतो. त्याने आपल्या आईला कधीही हॉस्पिटलच्या गाऊनमध्ये पाहिले नव्हते, त्यामुळे त्याने निरागसपणे विचारले, “आई, तू नाईटसूट का घातला आहेस?” त्यानंतर त्याचे लक्ष शेजारी झोपलेल्या बाळाकडे जाते. ती बाहुली आहे की खरे बाळ, या शंकेने तो आईला विचारतो, “आई, हे खरं बाळ आहे का?” जेव्हा त्याला कळते की ही त्याची छोटी बहीण आहे, तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरील आनंद पाहण्यासारखा होता.
आईच्या हातावरील सुयांच्या खुणा आणि मुलाची काळजी
व्हिडिओच्या एका भागात आईच्या हातावर ड्रिप आणि इंजेक्शनमुळे झालेल्या जखमांच्या खुणा दिसतात. हे पाहून तो चिमुकला मुलगा भावूक झाला आणि आपल्या आईच्या प्रकृतीबद्दल काळजी व्यक्त करू लागला. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे की, “एका आईचे बलिदान जेव्हा सामान्य मानले जाते, तेव्हा तिचे दुःख अदृश्य होते.” या व्हिडिओच्या शेवटी आईने बाळाला जन्म देताना शरीरावर होणारे परिणाम दर्शवणाऱ्या जखमांचे फोटोही जोडले आहेत, जे पाहून युजर्स अधिकच भावूक झाले आहेत.
नेटकऱ्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया
या व्हिडिओवर कमेंट्सचा वर्षाव होत आहे. एका युजरने म्हटले, “हा मुलगा खूप समजूतदार आहे, त्याला बहिणीपेक्षा आईची जास्त काळजी आहे.” दुसऱ्या एका युजरने आपल्या बालपणीची आठवण शेअर करत लिहिले की, “जेव्हा मी ४ वर्षांची होते, तेव्हा माझ्या भावाला पहिल्यांदा पाहून मला असेच वाटले होते.” मात्र, काही नेटकऱ्यांनी अशा परिस्थितीत व्हिडिओ रेकॉर्ड करण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले, तर काहींनी सुचवले की मोठ्या मुलाला अशा भेटीसाठी मानसिकदृष्ट्या आधीच तयार करायला हवे होते. तरीही, या भावा-बहिणीच्या पहिल्या भेटीने सोशल मीडियावर सर्वांची मने जिंकली आहेत.
