काही लोकांना साहसाची इतकी हौस असते की, त्या नादात ते स्वतःचा जीव धोक्यात घालतात. सध्या इंटरनेटवर असाच एक काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडिओ व्हायरल होत आहे. एका नदीत निवांत मस्ती करणाऱ्या तरुणाच्या हाताला अचानक चक्क मगर लागली. या घटनेचा शेवट एखाद्या थ्रिलर चित्रपटातील दृश्यासारखा झाला असून, हा व्हिडिओ पाहून नेटकरी थक्क झाले आहेत.
मासा समजून पकडली मगर!
व्हायरल व्हिडिओमध्ये एक तरुण नदीच्या मध्यभागी पाण्यात उतरून आनंद लुटताना दिसत आहे. तो समोर बोटीवर बसलेल्या आपल्या मित्रांकडे पाहून हसतोय आणि चेहऱ्यावर पाणी उडवून मजा करतोय. इतक्यात त्याला त्याच्या पायांजवळ काहीतरी हालचाल जाणवते. सुरुवातीला त्याला वाटते की कदाचित एखादा मोठा मासा असावा. तो मोठ्या उत्साहाने पाण्यात डुबकी मारतो आणि त्या ‘जीवाला’ घट्ट पकडून बाहेर काढतो. पण जेव्हा तो पाण्याबाहेर येतो, तेव्हा त्याच्या हातात मासा नसून एक जिवंत ‘मगर’ असते!
अवघ्या काही सेकंदांत फिरला पासा
मगरीला हातात धरताच त्या तरुणाची एका क्षणात शुद्ध हरपली. काही सेकंदांपूर्वी जो तरुण हसत होता, त्याच्या चेहऱ्यावर आता मृत्यूची भीती स्पष्ट दिसत होती. मगरीचा जबडा आणि तिचे रूप पाहून त्याने तात्काळ तिला पुन्हा पाण्यात फेकले आणि जीवाच्या आकांताने धावत बोटीवर चढला. या २७ सेकंदांच्या व्हिडिओमध्ये मृत्यूला जवळून पाहिल्याचा अनुभव त्या तरुणाला आला. सुदैवाने, मगरीने त्यावर प्रतिहल्ला केला नाही, अन्यथा हा प्रकार गंभीर बेतला असता.
नेटकऱ्यांच्या संतप्त आणि आश्चर्यकारक प्रतिक्रिया
@Rainmaker1973 नावाच्या एक्स (ट्विटर) हँडलवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून, आतापर्यंत हजारो लोकांनी तो पाहिला आहे. यावर कमेंट्सचा पाऊस पडत आहे. एका युजरने लिहिले, “हा खरोखर मृत्यूला स्पर्श करून परतण्याचा अनुभव होता.” तर दुसऱ्याने म्हटले, “नदी किंवा तलावात अशी मस्ती करणे कधीही महागात पडू शकते.” अनेक नेटकऱ्यांनी या घटनेला तरुणाचा मूर्खपणा म्हटले आहे, तर काहींनी हा निव्वळ योगायोग असल्याचे मानले आहे.
