Viral Video: 100 रुपयांत फक्त दोन गाजरं? लंडनमध्ये भारतीय नोटेची अवस्था पाहून नेटकरी म्हणाले, ‘आपला भारतच भारी!’
आपल्या देशात १०० रुपयांच्या नोटेला किती किंमत आहे, हे वेगळं सांगण्याची गरज नाही. १०० रुपयांत आपण पोटभर नाश्ता करू शकतो किंवा घरासाठी किलोभर भाजीपाला सहज विकत घेऊ शकतो. मात्र, सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला एक व्हिडिओ पाहून भारतीयांना धक्का बसला आहे. लंडनच्या पॉश बाजारपेठेत भारतीय १०० रुपयांच्या नोटेचं मूल्य केवळ ‘दोन गाजरं’ इतकंच निघालं आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांनी पुन्हा एकदा ‘आपला भारतच बेस्ट’ असल्याच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
१०० रुपयांत पाण्याची बाटलीही मिळेना
इन्स्टाग्रामवरील @veggiewander नावाच्या पेजवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. यामध्ये एक महिला हातात १०० रुपयांची नोट घेऊन लंडनच्या स्टोअरमध्ये खरेदीसाठी जाते. सुरुवातीला ती सँडविच खरेदी करण्याचा प्रयत्न करते, पण त्याचे भाव ऐकून तिला घाम फुटतो. त्यानंतर ती पाण्याची बाटली शोधते, मात्र तिथे पाण्याची एक बाटली तब्बल १४३ रुपयांना मिळत असल्याचं समोर येतं. विशेष म्हणजे, शंभर रुपयांत एक कोबीचा गड्डाही तिथे घेता आला नाही.
View this post on Instagram
अखेर दोन गाजरांवर मानावा लागला समाधान
संपूर्ण स्टोअर पालथं घातल्यानंतर जेव्हा काहीच बजेटमध्ये मिळेना, तेव्हा त्या महिलेने ओरिओ बिस्किटाचा पुडा घेण्याचा विचार केला. मात्र, तिथेही तिच्या पदरी निराशाच पडली. शेवटी बराच शोध घेतल्यावर कळलं की, लंडनमध्ये भारतीय १०० रुपयांत फक्त ‘दोन गाजरं’ खरेदी करता येतात. हा विरोधाभास पाहून भारतीय नेटकऱ्यांनी लंडनच्या महागड्या जीवनशैलीवर आश्चर्य व्यक्त केलं आहे.
‘लंडन सोडा आणि भारतात या’, नेटकऱ्यांचा सल्ला
हा व्हिडिओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. एका युजरने लिहिलं, “आपल्याकडे १०० रुपयांत पिशवीभर भाज्या येतात.” दुसऱ्याने मजेशीरपणे विचारलं, “जिथे पाणी १४३ रुपयांना मिळतं, तिथे लोक जिवंत कसे आहेत भाऊ?” काहींनी या व्हिडिओवर टीकाही केली आहे. एका युजरने म्हटलं की, “मॅडम, भारताची लंडनशी तुलना कशाला करताय? करायचीच असेल तर तिथल्या पगाराची तुलना करा, म्हणजे सगळं स्पष्ट होईल.” मात्र, बहुतांश भारतीयांनी आपल्या देशातील स्वस्त दराचं आणि १०० रुपयांच्या ताकदीचं कौतुक केलं आहे.
