Viral Video: नाते रक्ताचे नाही, माणुसकीचे! मालकिणीने दिले असे ‘सरप्राईज’ की नोकराणीला अश्रू अनावर; पहा भावूक व्हिडिओ
सोशल मीडियावर सध्या एक असा हृदयस्पर्शी व्हिडिओ व्हायरल होत आहे, जो माणुसकी आणि प्रेमाचे अनोखे उदाहरण सादर करत आहे. एका कुटुंबाने आपल्या घरी काम करणाऱ्या मावशींना (कामवाली बाई) एक खास सरप्राईज गिफ्ट दिले, ज्यावर त्यांची प्रतिक्रिया पाहून नेटकरी भावूक झाले आहेत. या व्हिडिओने सध्या इंटरनेटवर सर्वांची मने जिंकली आहेत.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये दिसते की, घरातील काम करणाऱ्या मावशी नेहमीप्रमाणे किचनमध्ये आपले काम करत आहेत. दरम्यान, घराची मालकीण त्यांना एका खोलीत बोलावते. तिथे एक मोठा बॉक्स ठेवलेला असतो. सुरुवातीला मावशींना काहीच कल्पना नसते, पण जेव्हा त्यांना समजते की त्या बॉक्समध्ये त्यांच्यासाठी एक नवीन ‘कूलर’ आहे, तेव्हा त्यांच्या आनंदाला पारावार उरत नाही.
मुलासारखा आनंद आणि माणुसकीची गळाभेट
नवीन कूलर पाहताच त्या मावशी लहान मुलांसारख्या आनंदाने उड्या मारू लागल्या. त्यांच्या चेहऱ्यावरील तो निरागस आनंद पाहून कोणाचेही डोळे ओलावतील. आनंदाच्या भरात त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता आपल्या मालकिणीला घट्ट मिठी मारली. ही मिठी केवळ एका भेटवस्तूसाठी नव्हती, तर ती त्या घरात मिळणाऱ्या सन्मानासाठी आणि आपुलकीसाठी होती.
‘आमच्या मुलांसारखीच ती आमची काळजी घेते’
हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर @lifeofcocoandchico या हँडलवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओ पोस्ट करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “आम्ही आमच्या हाऊस हेल्पची काळजी घेतली, कारण ती आमची आणि आमच्या पाळीव श्वानांची आपल्या मुलांसारखी काळजी घेते. तीदेखील या सर्व आनंदासाठी पात्र आहे.” हा व्हिडिओ आतापर्यंत ३१ लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे.
नेटकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव
या व्हिडिओवर कमेंट्सचा पाऊस पडत असून लोक या कुटुंबाच्या दातृत्वाचे कौतुक करत आहेत. एका युजरने लिहिले, “ज्या पद्धतीने त्यांनी मालकिणीला मिठी मारली, त्यावरून हे स्पष्ट होते की या घरात त्यांना किती मान मिळतो.” दुसऱ्या एका युजरने म्हटले की, “तिचा आनंद पाहून खूप छान वाटलं, माणुसकी अजूनही जिवंत आहे.”
