Viral Video: बेंगळुरूमध्ये ‘कढई’ बनली हेल्मेट! पोलिसांच्या दंडातून वाचण्यासाठी तरुणाची अजब शक्कल; सोशल मीडियावर व्हिडिओ पुन्हा व्हायरल
बेंगळुरू: भारताची सिलिकॉन व्हॅली म्हणून ओळखले जाणारे बेंगळुरू शहर हे केवळ आयटी कंपन्यांसाठीच नाही, तर तिथल्या विचित्र ट्रॅफिक आणि अतरंगी घटनांसाठीही प्रसिद्ध आहे. सध्या सोशल मीडियावर अशाच एका घटनेचा जुना व्हिडिओ पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. ट्रॅफिक पोलिसांच्या दंडापासून वाचण्यासाठी एका तरुणाने सुरक्षेचे सर्व नियम धाब्यावर बसवून डोक्यावर चक्क जेवण बनवण्याची ‘कढई’ परिधान केल्याचे या व्हिडिओत दिसत आहे.
नेमकी घटना काय?
हा व्हिडिओ ५ महिने जुना असल्याचे सांगितले जात असले तरी, नेटकऱ्यांमध्ये तो पुन्हा एकदा ‘सेंसेशन’ ठरला आहे. ही घटना बेंगळुरूच्या एचएसआर लेआउट ट्रॅफिक पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या रूपेना अग्रहारा भागात घडली होती. केरळ नोंदणी क्रमांक (KL 59 P 7471) असलेल्या एका पल्सर बाईकवर दोन तरुण स्वार होते. बाईक चालवणाऱ्या तरुणाने हेल्मेट घातले होते, मात्र मागे बसलेल्या तरुणाकडे हेल्मेट नसल्याने त्याने आपली ‘क्रिएटिव्हिटी’ वापरली.
कढईचा ‘असा’ केला हेल्मेट म्हणून वापर
रस्त्यावरील ट्रॅफिक कॅमेरे आणि पोलिसांच्या नजरेतून सुटण्यासाठी मागे बसलेल्या तरुणाने चक्क ॲल्युमिनियमची कढई आपल्या डोक्यावर पालथी घातली. त्याने ही कढई हाताने अशा पद्धतीने धरली होती की लांबून पाहणाऱ्याला तो काळ्या रंगाचा हेल्मेट असावा असा भास होत होता. रस्त्यावरून जाणाऱ्या इतर वाहनचालकांनी जेव्हा हा प्रकार पाहिला, तेव्हा त्यांना आपले हसू आवरता आले नाही आणि अनेकांनी हा क्षण मोबाईल कॅमेरात कैद केला.
नेटकऱ्यांनी ओढले ताशेरे
व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडिया युजर्सनी या तरुणाच्या बेजबाबदारपणावर सडकून टीका केली आहे. एका युजरने उपरोधिकपणे कमेंट केली की, “ही कढई ऑम्लेट बनवण्यासाठी ठीक आहे, पण अपघातात तुमचा जीव वाचवू शकणार नाही.” दुसऱ्या एका युजरने संताप व्यक्त करत म्हटले की, “असे लोक केवळ स्वतःचाच नाही तर इतरांचाही जीव धोक्यात घालतात.”
सुरक्षेपेक्षा दंडाची जास्त भीती?
ही घटना एका गंभीर मानसिकतेवर प्रकाश टाकते. अनेक लोक स्वतःच्या सुरक्षेपेक्षा दंडाच्या रकमेला जास्त घाबरतात आणि त्यातून वाचण्यासाठी अशा जीवघेण्या शक्कला लढवतात. ट्रॅफिक पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत.
